अमरावती: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता ५०० किलोमीटरपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत. यामुळे वेगमर्यादेचे उल्लंघन झाल्यास चालकांना ऑनलाइन दंड आकारला जाणार आहे. अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून, या कॅमेऱ्यांमुळे महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेत भर पडणार आहे.
वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर ऑनलाइन दंड
या महामार्गावर कारसाठी ताशी १२० किमी, तर ट्रकसाठी ८० किमी अशी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे, मात्र अनेक चालक याचे उल्लंघन करताना दिसतात. आता बसवण्यात येणारे सीसीटीव्ही कॅमेरे हे बायोमेट्रिक बाबींवर लक्ष ठेवतील. एक कॅमेरा ५०० मीटर परिघाला कव्हर करेल. प्रत्येक जिल्ह्यात कंट्रोल रूम तयार करून या कॅमेऱ्यांची तपासणी केली जाईल. महामार्गावर प्रवास करताना नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित चालकांना ऑनलाइन दंड निश्चित केला जाईल. दंडाची पावती लगेचच चालकाच्या मोबाईलवर पाठवली जाईल.
दरमहा ११ लाख वाहने धावतात
समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाल्यापासून मुंबईहून नागपूरकडे मोठ्या प्रमाणात वाहने धावत आहेत. अवजड वाहनांचीही संख्या वाढली असून, दरमहा ११ लाख मोठी-छोटी वाहने धावत असल्याचा अंदाज आहे. इतर महामार्गांच्या तुलनेत अवजड वाहनांसाठी कमी वेळेत निवडक ठिकाणी पोहोचता येत असल्याने समृद्धी महामार्गावर वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती नागपूर येथील एमएसीआरडीसीएलचे अधिकारी अभियंता गजानन पळसकर यांनी दिली.
वाहने थांबवता येणार नाहीत
नागपूर ते मुंबईपर्यंतचा प्रवास ८ तासांचा असल्याने कर्नाटक, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील वाहनांची संख्याही या महामार्गावर वाढली आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन आणि वाहने थांबवण्यासारख्या मनमानी कृत्यांवर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे चाप बसणार आहे. प्रवाशांनी नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करणे अपेक्षित आहे.
Leave a Reply