बंगळुरु : बुधवारी बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ११ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३३ जण जखमी झाले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांना ही माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दंडाधिकारीमार्फत चौकशीची घोषणा केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी स्टेडियमबाहेर एक लाखाहून अधिक चाहते जमले होते.१८ वर्षांनंतर आयपीएलची ट्रॉफी जिंकल्यामुळे आरसीबी संघाचे स्वागत करण्यासाठी आणि तरुण, महिला, पुरुष आणि अगदी वृद्धही रस्त्याच्या कडेला उभे होते. “पीएमओने एका X पोस्टमध्ये लिहिले आहे की, “बेंगळुरूमधील अपघात खूप दुःखद आहे. या दुःखाच्या वेळी, ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. जखमी झालेल्यांचे लवकर बरे व्हावे अशी मी प्रार्थना करतो.
आरसीबी संघ एका विशेष विमानाने जुन्या एचएएल विमानतळावर पोहोचला, जिथे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी त्यांचे स्वागत केले आणि त्यांना मिरवणुकीत हॉटेलमध्ये नेण्यात आले. स्वागत समारंभाच्या आधी राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि इतर मंत्र्यांनी संघाचे स्वागत केले. त्यानंतर संघाला पुन्हा मिरवणुकीत स्टेडियममध्ये जावे लागले. यादरम्यान, पाऊस सुरू झाला आणि त्यानंतर चेंगराचेंगरीही झाली. यामुळे संघ पुन्हा हॉटेलमध्ये परतला. शहराच्या विविध भागातून आरसीबी क्रमांक १८ जर्सी घातलेले लोक त्यांच्या वाहनांमध्ये स्टेडियमकडे जात होते. मेट्रो गाड्यांमध्ये इतकी गर्दी होती की बरेच लोक मेट्रोमध्ये चढू शकले नाहीत. यावेळी लोक ‘आरसीबी…आरसीबी…’ असे घोषणा देत होते.
मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपये, जखमींवर मोफत उपचार
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. जखमींवर उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी तीव्र संवेदना व्यक्त केली. सरकारने मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपये भरपाई जाहीर केली आहे. यासोबतच जखमींसाठी मोफत उपचार जाहीर करण्यात आले आहेत. ते पुढे म्हणाले की, स्टेडियमची क्षमता ३५ हजार आहे, परंतु उत्सवात सामील होण्यासाठी २ ते ३ लाख लोक पोहोचले होते. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, जेव्हा स्टेडियमच्या बाहेर चेंगराचेंगरी झाली तेव्हा आत जल्लोष सुरू होता. भाजपने आरोप केला आहे की अनेक काँग्रेस पक्षाचे नेते खेळाडूंसोबत फोटो काढण्यात व्यस्त होते. जेव्हा चेंगराचेंगरी झाली तेव्हा स्टेडियमच्या बाहेर एक लाखाहून अधिक लोक उपस्थित होते.


Leave a Reply