मुंबई: महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूमधील एका किल्ल्यासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूण १२ ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी ‘एक्स’ (X) वर ही आनंदाची बातमी दिली. या किल्ल्यांमध्ये स्वराज्याची पहिली राजधानी राजगड, दुसरी राजधानी रायगड, शिवछत्रपतींचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला, तसेच साल्हेर, लोहगड, खांदेरी, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, आणि सिंधुदुर्ग या महाराष्ट्रातील किल्ल्यांचा समावेश आहे. याबरोबरच, तामिळनाडूमधील जिंजी किल्ल्याचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे.
पॅरिसमध्ये ऐतिहासिक घोषणा
संयुक्त राष्ट्रसंघाची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) ने पॅरिस येथे सुरू असलेल्या ४७व्या जागतिक वारसास्थळ समितीच्या अधिवेशनात (४७th World Heritage Committee session) ही घोषणा केली. ६ जुलै रोजी सुरू झालेले हे अधिवेशन १६ जुलैपर्यंत चालणार असून, ११ ते १३ जुलैदरम्यान विविध देशांच्या नामांकनांवर चर्चा केली जात आहे. मूल्यांकनाची प्रक्रिया शुक्रवारी सुरू झाली आणि त्यात या किल्ल्यांची निवड करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आनंद
हा क्षण “देशभरातील शिवभक्तांसाठी आनंदाचा क्षण” असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यांनी या ऐतिहासिक उपलब्धीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानले. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) आणि संस्कृती मंत्रालयाचे सहकार्य अत्यंत मोलाचे ठरल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपमुख्यमंत्र्यांसह (एकनाथ शिंदे आणि अजित पवार) अनेक अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. मंत्री आशिष शेलार यांनी युनेस्कोच्या महासंचालकांची भेट घेऊन केलेले तांत्रिक सादरीकरण महत्त्वाचे ठरले. अपर मुख्य सचिव विकास खारगे, भारताचे युनेस्कोतील राजदूत विशाल शर्मा, आणि पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे हेमंत दळवी यांनीही या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला.
Leave a Reply