मुंबई : मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी १४ अतिरिक्त न्यायमूर्तींनी पदाची शपथ घेतली. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांच्या हस्ते हा शपथविधी पार पडला. केंद्र सरकारच्या कायदा व न्याय मंत्रालयाच्या शिफारशीवरून या नियुक्त्या झाल्या असून, सर्वोच्च न्यायालयाने १९ ऑगस्ट रोजी प्रस्तावास मंजुरी दिली होती. त्यानंतर केंद्र सरकारकडून २९ ऑगस्टला मान्यता मिळाली आणि राष्ट्रपतींकडून अंतिम शिक्कामोर्तब झाल्यानंतर अल्पावधीतच हा शपथविधी सोहळा पार पडला.
नवीन नियुक्त्यांमुळे मुंबई उच्च न्यायालयाची न्यायाधीशांची एकूण संख्या आता ६८ वर पोहोचली आहे. मंजूर संख्या ९४ असली तरी अद्याप काही पदे रिक्त आहेत. सध्या प्रलंबित खटल्यांची मोठी संख्या लक्षात घेता नव्या न्यायमूर्तींचा समावेश न्यायालयीन कामकाजात गती आणणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या नव्या न्यायमूर्तींच्या यादीत हितेंद्र वेणगावकर, अमित जामसंडेकर, मेहरोज खान पठाण, सिद्धेश्वर ठोंबरे, रणजीतसिंह भोसले, मंदार देशपांडे, आशिष चव्हाण, वैभव पाटील जाणेव, संदीप पाटील, आबासाहेब शिंदे, श्रीराम शिरसाट, फऱहान दुबाष, रजनी व्यास आणि राज वाकडे यांचा समावेश आहे.
यापैकी हितेंद्र वेणगावकर, आशिष चव्हाण, संदीप पाटील आणि श्रीराम शिरसाट हे चौघेही सरकारी कायदेशीर कामकाजात सक्रिय होते. विशेष म्हणजे, वेणगावकर यांनी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकारचे वरिष्ठ वकील म्हणून काम करताना अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये प्रभावी बाजू मांडली होती. या शपथविधीमुळे उच्च न्यायालयातील न्यायनिर्णय प्रक्रिया अधिक कार्यक्षम होईल आणि सामान्य जनतेच्या न्यायप्रविष्ट प्रकरणांचा निपटारा जलद गतीने होईल, अशी सर्वत्र अपेक्षा आहे.
Leave a Reply