१४ वर्षांचा वैभव सूर्यवंशी : जिद्द, मेहनत आणि आक्रमक शैलीच्या जोरावर थेट ‘आयपीएल’मध्ये प्रवेश

राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात झालेल्या आयपीएल सामन्यात एका नवोदित खेळाडूने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले तो म्हणजे अवघ्या १४ वर्षांचा सलामीवीर वैभव सूर्यवंशी. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी वयाचा पदार्पण करणारा खेळाडू ठरण्याचा मान मिळवलेल्या वैभवने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत आपल्या आत्मविश्वासाची झलक दाखवली. पण हे यश तितकेसे सहजसोपे नव्हते; त्यामागे आहे अपार मेहनत, चिकाटी आणि त्याच्या कुटुंबियांची अखंड साथ.

वैभवमधील असामान्य क्रिकेट कौशल्य सर्वप्रथम ओळखले ते प्रशिक्षक मनीष ओझा यांनी. केवळ आठ वर्षांचा असताना त्यांनी वैभवमधील नैसर्गिक फलंदाजी शैली, स्टान्स, आक्रमकता आणि बॅटिंग तंत्र पाहून त्याला योग्य दिशेने घडवण्याचे ठरवले. “त्याला फक्त योग्य मार्गदर्शन आणि सातत्य हवा होता,” असं प्रशिक्षक ओझा सांगतात.

ओझा पुढे सांगतात, “लोकांना त्याचे फटके लक्षात राहतात, पण माझं लक्ष त्याच्या हालचालींवर, टायमिंगवर आणि बॅटच्या वेगावर असतं. दररोज ६०० चेंडूंचा सराव करणं ही गोष्ट सामान्य नाही. त्याची शैली युवराज सिंगची आठवण करून देते.”

वैभवच्या यशामागे त्याच्या पालकांची भूमिका फार महत्त्वाची आहे. वैभवचे वडील त्याला सामना किंवा सरावासाठी दर दुसऱ्या दिवशी १०० किमीचा प्रवास करत आणायचे, तर आई त्याच्या आहारावर काटेकोर लक्ष ठेवायची. सरावादरम्यान वडील दहा डबे आणायचे – एक वैभवसाठी आणि उर्वरित गोलंदाजांसाठी.

फक्त १२ वर्षांचा असतानाच बिहार क्रिकेट संघटनेने त्याला रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्याची संधी दिली. त्यानंतर तो भारताच्या अंडर-१९ संघातही खेळला. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेत राजस्थान रॉयल्सने १.१० कोटी रुपयांना त्याला आयपीएलसाठी विकत घेतलं.

तळेगाव अकादमीत राहुल द्रविड आणि झुबिन बरुचा यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने १५० किमी वेगाने येणाऱ्या चेंडूंवर सराव करत स्वतःला अधिकाधिक सक्षम केलं.

आणि अखेर तो ऐतिहासिक क्षण आला पदार्पणाच्या सामन्यात २० चेंडूंमध्ये ३४ धावा ठोकत वैभवने आपल्या नावाची ठसठशीत नोंद केली. फक्त एक खेळाडू म्हणून नव्हे, तर मेहनत, समर्पण आणि लहान वयात मोठं यश मिळवणाऱ्या नव्या पिढीचं प्रतीक म्हणून तो सर्वांसमोर उभा राहिला.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *