छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात गेल्या २२ महिन्यांत तब्बल २ लाख ३६ हजार ५२ कुणबी जात प्रमाणपत्रे नागरिकांना देण्यात आली आहेत. ९ नोव्हेंबर २०२३ पासून ३१ जुलै २०२५ पर्यंत ही प्रक्रिया पार पडली असून, दरमहा सरासरी दहा हजारांहून अधिक प्रमाणपत्रे दिली गेल्याची माहिती समोर आली आहे. सरकारने कुणबी समाजासाठी दिलेल्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ही प्रमाणपत्रे महत्त्वाची ठरली आहेत. जिल्हानिहाय आकडेवारी पाहता, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९१,९५१, जालना ४३,९३२, परभणी ३४,१३१, हिंगोली १५,२६१, लातूर २५,४३८, बीड २७,५२६, नांदेड ३५,६०८ तर धाराशिव जिल्ह्यात ३९,०३८ प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.
राज्य सरकारच्या आदेशानुसार पंचायत समित्या, एकात्मिक बालविकास सेवा योजना, महसूल विभाग, शाळा, शिक्षण मंडळे आदी विविध शासकीय यंत्रणांच्या नोंदींचा आधार घेऊन कुणबी प्रमाणपत्रे दिली जात आहेत. यात जुनी शालेय दाखले, जन्म-मृत्यू नोंदी, मतदार यादी, जमीन नोंदी, विवाह नोंदी आदी कागदपत्रांचा उपयोग केला जात आहे. या प्रक्रियेस गती देण्यासाठी व पारदर्शकता राखण्यासाठी २१ सदस्यीय समिती कार्यरत असून, तिच्या बैठकीत निर्णय घेतले जात आहेत. समितीचे अध्यक्ष उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील असून, विविध तज्ज्ञ आणि अधिकारी त्यात सहभागी आहेत. मराठवाड्यात दिल्या गेलेल्या प्रमाणपत्रांच्या या विक्रमी आकड्यामुळे आरक्षण प्रक्रियेला गती मिळाल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे कुणबी समाजातील हजारो कुटुंबांना शैक्षणिक व नोकरीच्या संधींमध्ये थेट लाभ मिळणार आहे.
Leave a Reply