बीडमध्ये आकाशातून पडले २ दगड, शास्त्रज्ञांनी सांगितलं खरं कारण

बीड : जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील खलवट-निमगाव येथे आकाशातून पडलेल्या दोन दगडांच्या घटनेची शास्त्रज्ञांनी पुष्टी केली असून, हे उल्कापिंड असल्याचे स्पष्ट झाले आहे. ३ मार्च रोजी दुपारी सुमारे २ वाजता या दुर्गम गावात हे दगड आकाशातून कोसळले. त्यांच्या तीव्रतेमुळे आसपासच्या नागरिकांच्या कानांना त्रास जाणवला, तसेच एका दगडाने शेतकऱ्याच्या घराच्या टिनशेडलाही धडक दिली.
आकाशातून दगड पडल्याची बातमी गावभर पसरताच नागरिकांमध्ये भितीचे वातारवण निर्माण झाले. वडवणी तहसीलदार वैभव महिंद्रकर यांनी सांगितले की, हे दगड दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापडले आहेत. “रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, या दगडांना स्पर्श केल्यावर ते थंड वाटत होते. आम्ही घटनास्थळी पंचनामा केला असून, हे दगड जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले आहेत. नागरिकांनी घाबरू नये, असे त्यांनी सांगितले.
बीड जिल्हा प्रशासनाने छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल आणि अंतराळ विज्ञान केंद्र येथील तज्ज्ञांना या दगडांचे परीक्षण करण्यासाठी आमंत्रित केले. केंद्राचे संचालक डॉ. श्रीनिवास औंधकर यांनी बुधवारी सांगितले की, प्राथमिक निरीक्षणांनुसार हे खरोखरच उल्कापिंड असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गुरुत्वाकर्षण, चुंबकीय गुणधर्म आणि इतर महत्त्वाच्या निकषांच्या आधारे, हे दगड पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केलेल्या लघुग्रहाचे अवशेष असल्याचे दिसते. आम्ही त्यांचा अधिक सखोल अभ्यास करत आहोत,” असे डॉ. औंधकर यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले.

 

डॉ. औंधकर पुढे म्हणाले, “सामान्यतः उल्कापिंड पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचण्याआधीच वातावरणात जळून नष्ट होतात. मात्र, जे उल्कापिंड वातावरणातून यशस्वीपणे पार होऊन जमिनीवर कोसळतात, त्यांनाच खऱ्या अर्थाने उल्कापिंड म्हणतात. खगोलशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, मराठवाड्यात उल्कापिंड पृथ्वीवर कोसळल्याची ही अनेक वर्षांनंतरची पहिलीच घटना आहे. या घटनेने खगोलप्रेमी आणि वैज्ञानिक वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले असून, या दगडांच्या अभ्यासातून आणखी महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *