छत्रपती संभाजीनगर | पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी विधानसभेच्या निवडणुकीत तब्बल २० हजार मतदार बाहेरून आणल्याची कबुली दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही कबुली त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गटप्रमुख व बूथप्रमुखांच्या बैठकीत दिली. शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर येथे संत एकनाथ रंगमंदिरात झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री शिंदे, पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे तसेच जिल्ह्यातील पक्षाचे आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली होती.
बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भुमरे यांना विचारले की, “गेल्या निवडणुकीत तुम्ही कसे जिंकलात?” त्यावर उत्तर देताना भुमरे यांनी थेट सांगितले की, “मी बाहेरच्या २० हजार मतदारांना मतदानासाठी आणले होते.” त्यांच्या या विधानानंतर उपस्थितांमध्ये काही क्षण शांतता पसरली. नंतर शिंदे यांनी हसत वातावरण हलके केले असले तरी, या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
विरोधी पक्षांनी या कबुलीवर तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. “जर बाहेरच्या मतदारांना मतदानासाठी आणले गेले असेल, तर ते निवडणूक प्रक्रियेवरील आघात आहे,” असे विधान विरोधकांनी केले. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी देखील काही नेत्यांनी केली आहे.
दरम्यान, भुमरे समर्थकांचे म्हणणे आहे की, त्यांनी फक्त स्थलांतरित मतदारांना मतदानासाठी आणले, यात काही गैरकायदेशीर नव्हते. मात्र, या कबुलीमुळे आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटासाठी ही एक संवेदनशील परिस्थिती निर्माण झाली आहे.
Leave a Reply