आपल्या विधानांमुळे नेहमीच नवनव्या वादांना तोंड फोडणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर हे त्यांच्या एका नव्या पुस्तकात करण्यात आलेल्या दाव्यामुळे चर्चेत आहेत. मणिशंकर अय्यर यांनी त्यांच्या A Maverick in Politics पुस्तकामध्ये २०१२ मध्ये काँग्रेसमध्ये घडलेल्या घटनाक्रमाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. या पुस्तकातील एका लेखामध्ये मणिशंकर अय्यर लिहितात की, २०१२ मध्ये जेव्हा राष्ट्रपती निवडणूक होणार होती, तेव्हा यूपीए-२ सरकारचं नेतृत्व प्रणव मुखर्जी यांच्याकडे सोपवून मनमोहन सिंग यांना राष्ट्रपती बनवलं गेलं पाहिजे होतं. तसं झालं असतं तर यूपीए सरकारमध्ये जी धोरणलकव्याची स्थिती निर्माण झाली होती, ती निर्माण झाली नसती. जर डॉ. मनमोहन सिंग यांना राष्ट्रपती आणि प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधान केले गेले असते तर काँग्रेसवर २०१४ साली अवमानकारक पराभवाची परिस्थिती ओढवली नसती. काँग्रेसला त्या निवडणुकीत केवळ ४४ जागा जिंकता आल्या होत्या.
“२०१२ साली प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधान करायला हवे होते”
मणिशंकर अय्यर यांनी २०१२ साली काँग्रेसवर कोसळलेल्या दोन संकटाबद्दलही भाष्य केले. ते म्हणाले, २०१२ साली तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आजारी होत्या तर तत्कालीन पंतप्रधान मनमोह सिंग यांच्या सहा बायपास सर्जरी झाल्या होत्या. पक्षाने त्यावेळी प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधान बनवले असते आणि नंतर राष्ट्रपती केले असते तरी चालले असते. असे झाले असते तर २०१४ साली काँग्रेसचा इतका वाईट पराभव झाला नसता. या पुस्तकात मणिशंकर यांनी प्रणव मुखर्जी यांनी सांगितलेल्या आठवणीचा एक किस्ता सांगत लिहिलं की, जेव्हा सोनिया गांधी ह्या कौशांबी येथील पर्वतात विश्रांतीसाठी आल्या होत्या. तेव्हा त्यांनी मनमोहन सिंग यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार बनवण्याचा विचार करत असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे डॉ. मनमोहमन सिंग यांना राष्ट्रपतीपदासाठी निवडलं गेलं तर सोनिया गांधी ह्या आपली पंतप्रधानपदासाठी निवड करतील, असं सोनिया गांधी यांना वाटलं. मात्र अखेरीस मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदी कायम ठेवत प्रणव मुखर्जी यांचं नाव राष्ट्रपतीपदासाठी समोर आणण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे काँग्रेससाठी यूपीए-३ सरकार स्थापन करण्याची शक्यता मावळली.
Leave a Reply