गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तराखंडमधील ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या समारोप समारंभात मोठी घोषणा केली. २०३६ मध्ये ऑलिंपिक स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यास भारत पूर्णपणे सक्षम आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. “भारताच्या क्रीडा क्षेत्राचे भवितव्य अत्यंत उज्ज्वल आहे. आम्ही २०३६ च्या ऑलिंपिक स्पर्धांसाठी दावा केला आहे आणि त्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. एकदा भारतात ऑलिंपिकचे आयोजन झाले की, आपले खेळाडू पदके जिंकून देशाचा झेंडा जगभरात उंचावतील,” असे शहा यांनी उत्साहाने सांगितले.
ऑलिंपिक आयोजनाच्या दिशेने भारताचे पाऊल
भारताने २०३६ च्या ऑलिंपिक स्पर्धेच्या आयोजनासाठी अधिकृत मागणी केली असली, तरी ही प्रक्रिया सध्या प्राथमिक टप्प्यात आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती या दाव्यावर अंतिम निर्णय पुढील वर्षी घेईल. या भव्य समारंभासाठी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल क्रीडाप्रेमींनी खचाखच भरले होते. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अमित शाह यांचे स्वागत केले.
शाह यांनी मुख्यमंत्री धामी यांच्या क्रीडाविषयक प्रयत्नांची प्रशंसा करत, राज्यात क्रीडा क्षेत्रात झालेल्या लक्षणीय प्रगतीबद्दल गौरवोद्गार काढले. “धामीजींनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात क्रीडासंबंधी भक्कम पायाभूत सुविधा उभारल्या आहेत. उत्तराखंडच्या खेळाडूंनी ‘देवभूमी’ला ‘खेळभूमी’ बनवले आहे.”त्यांनी आकडेवारी देत सांगितले की, उत्तराखंडने मागील क्रीडा स्पर्धांमध्ये २५ व्या स्थानावरून थेट ७ व्या स्थानावर झेप घेतली आहे, हेच खेळाडूंच्या मेहनतीचे आणि शासनाच्या प्रयत्नांचे फलित आहे.
अमित शाह यांनी भारतीय खेळाडूंसाठी उज्ज्वल भविष्यातील चित्र रेखाटले. “सरकार देशभरात जागतिक दर्जाची क्रीडा सुविधा आणि परिसंस्था उभारत आहे. त्यामुळे भारत क्रीडाक्षेत्रात महासत्ता बनेल,”असा त्यांचा ठाम विश्वास आहे. ते पुढे म्हणाले की, “२०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर क्रीडा क्षेत्राला मोठी चालना मिळाली आहे. त्यावेळी क्रीडासाठीचे बजेट ८०० कोटी रुपये होते, आता ते थेट ३,८०० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. हे मोदी सरकारच्या क्रीडाविषयी असलेल्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे.”
क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनीही खेळाडूंच्या मेहनतीचे कौतुक करत, या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला “भारताच्या जागतिक क्रीडाकेंद्र होण्याच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा” असे संबोधले. ते म्हणाले, “भारतीय खेळाडूंच्या कामगिरीत सातत्याने वाढ होत आहे. भविष्यात ऑलिंपिकमध्ये भारताच्या खेळाडूंचे नाव आघाडीच्या टॉप-१० मध्ये असेल. देशातील क्रीडा परिसंस्था सक्षम होत असून, खेळांसह इतर सर्वच क्षेत्रांत भारत वेगाने पुढे जात आहे.” भारताने २०३६ मध्ये ऑलिंपिक आयोजित करण्याचा निर्धार केला आहे आणि त्यादृष्टीने सरकार ठोस पावले उचलत आहे. जागतिक दर्जाच्या सुविधा आणि खेळाडूंसाठी अनुकूल वातावरण निर्माण करून भारतातील क्रीडाक्षेत्राच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे
Leave a Reply