मराठवाड्यात तीन महिन्यांत २६९ शेतकरी आत्महत्या; बीड जिल्ह्यात सर्वाधिक ७१ प्रकरणे

मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांची गंभीर समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. चालू वर्षातील केवळ पहिल्या तीन महिन्यांत – १ जानेवारी ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत – मराठवाडा विभागात एकूण २६९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालानुसार, ही सरासरी दररोज तीन शेतकरी आत्महत्या करत असल्याची चिंताजनक स्थिती दर्शवते.

जिल्हानिहाय आकडेवारी पाहता, बीड जिल्ह्यात सर्वाधिक ७१ आत्महत्यांचे प्रकार नोंदवले गेले आहेत. त्याखालोखाल छत्रपती संभाजीनगरमध्ये ५०, हिंगोलीत ३७, परभणीत ३३, धाराशिवमध्ये ३१, लातूरमध्ये १८ आणि जालन्यात १३ शेतकऱ्यांनी जीवन संपवले.

जिल्हानिहाय आत्महत्यांचे प्रमाण
• बीड- ७१
• छत्रपती संभाजीनगर- ५०
• हिंगोली- ३७
• परभणी- ३३
• धाराशिव- ३१
• लातूर- १८
• जालना- १३
• एकूण- २६९

शेतकरी आत्महत्यांमागील कारणांचा अभ्यास करता, आर्थिक अडचणी आणि निसर्गनिर्भरतेचा फटका ही प्रमुख कारणे असल्याचे स्पष्ट झाले आहे:
• वाढता शेती उत्पादन खर्च आणि त्यावर मिळणारा तोकडा मोबदला
• बाजारात शेतमालाला न मिळणारा योग्य भाव
• हवामानातील अस्थिरता आणि परिणामी नापिकी
• बँक व खासगी सावकारांच्या कर्जाचा बोजा
• अतिवृष्टी, गारपीट यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे नुकसान

या संकटांनी गांजलेल्या शेतकऱ्यांसमोर आर्थिक, मानसिक आणि सामाजिक अडचणींचा डोंगर उभा ठाकला असून, अनेकजण हताश होऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत.
आत्महत्याग्रस्त कुटुंबांना दिली जाणारी सरकारी मदत अद्याप पूर्णपणे पोहोचलेली नाही. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या माहितीनुसार, आतापर्यंत ७९ प्रकरणांतच मदतीचे मंजुरी आदेश देण्यात आले आहेत. १३ प्रकरणे अपात्र ठरवण्यात आली, तर तब्बल १७७ प्रकरणांची चौकशी अद्याप सुरू आहे.

मासिक आधारावर आत्महत्यांचे आकडे
• जानेवारी : ८७
• फेब्रुवारी : ७६
• मार्च : १०६
• एकूण : २६९

मराठवाड्यातील शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत दयनीय आणि संकटग्रस्त झाली आहे. वाढत्या आत्महत्यांचे हे चित्र संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. शासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना राबवून शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची नितांत गरज आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *