ब्रेकअपनंतर वैयक्तिक रागातून सूड उगवण्याचे विकृत प्रकार अलीकडच्या काळात वाढताना दिसत आहेत. नादिया येथे घडलेली एक धक्कादायक घटना याचे ज्वलंत उदाहरण ठरली आहे. एका २४ वर्षीय तरुणीला त्रास देण्यासाठी तिच्या माजी प्रियकराने तिला तब्बल ३०० ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ (COD) पार्सल पाठवली. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल होताच, आरोपीला अटक करण्यात आली आहे. संबंध तुटल्यानंतरही संबंधित युवकाने पाठपुरावा करत त्रास देण्यास सुरुवात केली. गेल्या चार महिन्यांपासून त्याने विविध ई-कॉमर्स संकेतस्थळांवरून तिच्या नावाने कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डर करून त्या वस्तू तिच्या राहत्या पत्त्यावर पाठवल्या. परिणामी, या तरुणीला मानसिक आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागले. या सातत्यपूर्ण आणि अनावश्यक ऑर्डर्समुळे संबंधित ऑनलाइन कंपन्यांनी तिचे ग्राहक खाते निलंबित केले. त्यामुळे तिच्या दैनंदिन ऑनलाइन खरेदी व्यवहारांवरही परिणाम झाला. या प्रकाराची सुरुवातीला कंपनीतील सहकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली. मात्र, तपास अधिक खोलात गेल्यानंतर तिचा माजी प्रियकर सुमन सिकदर याने हे सर्व प्रकार केल्याचे निष्पन्न झाले. अटकेनंतर पोलिसांसमोर त्याने कबुली दिली की, “ती माझ्याकडून जास्त अपेक्षा ठेवत होती, ज्या मी पूर्ण करू शकलो नाही. त्यामुळे तिने संबंध तोडला आणि मी सूड घ्यायचे ठरवले.”
तक्रारदार तरुणीने पोलिसांना सांगितले की, नोव्हेंबर २०२४ पासून तिच्या घरी सतत कॅश ऑन डिलिव्हरी पार्सल येत होती. त्यामध्ये मोबाईल फोन, टॅब्लेट, कपडे, भेटवस्तू अशा महागड्या वस्तूंचा समावेश होता. “फेब्रुवारीत व्हॅलेंटाईन वीकमध्ये तर दररोज अनेक गिफ्ट्स आल्याने घरातील सदस्य आणि डिलिव्हरी एजंटांमध्ये वादही झाले,” असे तिने नमूद केले. सुमन सिकदर याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला जामिनावर सोडले. मात्र, त्याच्याविरुद्ध न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून, पोलिसांकडून तपास सुरु आहे.
“आरोपीने ई-कॉमर्सचा वापर करून माजी प्रेयसीवर मानसिक दबाव टाकण्याचा प्रकार केला. त्याने बनावट मोबाईल क्रमांकांवरून कॉल आणि मेसेज करूनही तिला त्रास दिला,” असे तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे ब्रेकअपनंतर होणाऱ्या मानसिक छळासंदर्भात कायदेशीर उपाययोजनांची गरज अधोरेखित झाली आहे. पीडित तरुणीने दाखवलेले धैर्य आणि पोलिसांची तत्पर कारवाई यामुळे या प्रकाराला वेळीच आळा घालण्यात यश आले आहे.
Leave a Reply