सायबर गुन्ह्यांच्या जाळ्यात अडकलेल्या ६० हून अधिक भारतीय नागरिकांची महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सुटका केली आहे. या नागरिकांना थायलंडमध्ये उच्च पगाराच्या नोकऱ्यांचे आमिष दाखवून फसवण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात त्यांना मायनमारच्या सशस्त्र बंडखोरांच्या ताब्यात देऊन सायबर फसवणुकीसाठी जबरदस्तीने वापरण्यात येत होते. ही कारवाई गुरुवारी पार पडली असून,यामध्ये कझाक नागरिकासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. हे आरोपी पीडितांना सायबर गुलामीसाठी जबरदस्तीने काम करायला लावत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरून हे आरोपी भारतातील तरुणांशी संपर्क साधत आणि त्यांना थायलंड व इतर आशियाई देशांमध्ये मोठ्या पगाराच्या नोकऱ्यांचं आमिष दाखवत. नंतर त्यांचं पासपोर्ट व फ्लाइट तिकीट तयार करून टुरिस्ट व्हिसावर थायलंडला पाठवण्यात येत असे. मात्र थायलंडमध्ये पोहचल्यावर त्यांना मायनमारच्या सीमेवर नेलं जात आणि छोट्या होड्यांमधून नदी पार करून देशात बेकायदेशीरपणे घुसवण्यात येत असे.मायनमारमध्ये पोहचल्यानंतर,या पीडितांना बंडखोरांच्या संरक्षणाखालील बंदिस्त कंपाउंडमध्ये ठेवण्यात येत होतं. इथे त्यांच्याकडून ‘डिजिटल अटक’ घोटाळे, बनावट गुंतवणूक योजना अशा विविध प्रकारचे सायबर गुन्हे करवून घेतले जात होते. या गुन्ह्यांसाठी त्यांच्यावर अमानुष छळ केला जात असे .पासपोर्ट काढून घेतले जात आणि जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मनीष ग्रे उर्फ मॅडी याला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तो एक व्यावसायिक अभिनेता असून,विविध वेब सिरीज व टीव्ही मालिकांमध्ये झळकलेला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Leave a Reply