गडचिरोलीत माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले की बंदुकीचा नक्षलवाद संपत चालला असून आता शहरी नक्षलवाद हेच खरं आव्हान उरलं आहे. “अराजकतावाद्यांना आम्ही पराजित करू. संविधान न मानणाऱ्यांना बाबासाहेबांचं संविधान हरवेल,” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.
गडचिरोली पोलीस आणि राज्याच्या गृह विभागाच्या संयुक्त कारवाईत माओवादी चळवळीतील वरिष्ठ नेता मल्लोजूला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती याने आपल्या ६० सहकाऱ्यांसह शरणागती पत्करली. विशेष म्हणजे हे आत्मसमर्पण कुठल्याही रक्तपाताविना झाले आहे. एकूण ६१ माओवाद्यांनी शस्त्र खाली ठेवून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याने गडचिरोली जिल्हा माओवादी प्रभावातून मुक्त होण्याची आशा निर्माण झाली आहे.
भूपती हा माओवादी चळवळीचा अत्यंत प्रभावी कमांडर मानला जातो. तो केंद्रीय समिती आणि पॉलीट ब्युरोचा सदस्य होता तसेच गडचिरोलीत माओवादी संघटनांची उभारणी आणि प्रशिक्षण देण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती. त्याच्यावर सुमारे सहा कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर होते.
फडणवीस म्हणाले, “उत्तर गडचिरोली आधीच नक्षलमुक्त झाले आहे. दक्षिण गडचिरोलीत उरलेल्या माओवादी गटांनीही आत्मसमर्पण करावे. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे आणि विकासामुळे नक्षलवाद्यांना शरणागती पत्करण्यास प्रवृत्त करण्यात यश आले आहे.” छत्तीसगडमध्येही लवकरच मोठ्या प्रमाणावर आत्मसमर्पण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या घटनेमुळे माओवादी चळवळीवर निर्णायक आघात झाला असून राज्य पोलिसांना आतापर्यंतचे सर्वात मोठे यश मिळाले आहे. गडचिरोली नक्षलमुक्त होण्याच्या दिशेने हा मोठा टप्पा मानला जात आहे.


Leave a Reply