सोलापूर : सोलापूरच्या अक्कलकोट एमआयडीसीमधील सेंट्रल टॉवेल कारखान्याला रविवारी पहाटे 3 वाजता अचानक आग लागलीये. या आगीत कारखान्याचे मालक उस्मान मन्सूरी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 4 तर कामगार मेहताब बागवान यांच्या कुटुंबातील चौघांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मृतांमध्ये 1 वर्षीय चिमुकल्याचा देखील समावेश आहे.गेल्या 25 वर्षांपासून उस्मान मन्सूरी यांचा सोलापुरातील अक्कलकोट एमआयडीसीमध्ये टॉवेल बनवण्याचा करखाना आहे. या कारखान्यात जवळपास 150 पेक्षा जास्त कामगार काम करत होते. कारखान्याच्याच परिसरात खाली कामगारांना राहण्याची सोय करण्यात आली होती. तर वरच्या भागात कारखान्याचे मालक स्वतः राहत होते. त्या रात्री अचानक आग भडकली. काही. अग्निशमन दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्या. यादरम्यान अग्निशमन दलाने काही कामगारांना सुखरूप बाहेर काढले.
पहाटे 5.30 च्या सुमारास आगीतून 4 कामगारांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानानी बाहेर काढले होते. कामगार मेहताब बागवान 55, त्यांची पत्नी आशाबानो बागवान 50, मुलगी हीना बागवान 33 आणि मुलगा सलमान बागवान 30 असे चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. कारखाना मालक उस्मान मन्सूरी यांचं कुटुंबीय अजून देखील आतमध्ये अडकलेले होते. मात्र आग इतकी भीषण होती की, अग्निशमन दलाचे आत जाऊ शकत नव्हते. आत जाताना अग्निशमन दलाचे अधीक्षक राजेश साळुंखे यांचा हात गंभीर भाजला. 14 तास जवळपास 65 पेक्षा जास्त बंबाने अग्निशमन दल आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होते. आगीतून मार्ग काढण्यासाठी जेसीबीने भिंत फोडून बेडरुममध्ये धाव घेतली. मात्र, बेडरुममधून उस्मान अन्सारी यांच्यासह कुटुंबीयांचे 4 मृतदेहच त्यांच्या हाती लागले. कारखान्याचे मालक उस्मान मन्सूरी वय 87, अनस मंसूरी वय 24 (नातू), शीफा मंसूरी वय 22( नातसून), युसुफ मंसूरी नातू अनसचा एक वर्षाचा चिमुकला यांचा आगीने जीव घेतला होता.
या 8 जणांचा आगीत होरपळून मृत्यू
या भीषण घटनेत एकूण 8 जणांचा मृत्यू या घटनेत झाला आहे. त्यामध्ये सेंट्रल इंडस्ट्रीचे मालक उस्मान मन्सूरी वय 87, अनस मन्सूरी वय 24, शीफा मन्सूरी वय 22, युसुफ मन्सूरी वय 1 वर्ष, अशाबानो बागवान वय 50, मेहताब बागवान वय 55, हिना बागवान वय 35, सलमान बागवान वय 38 असे होरपळून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
राष्ट्रपती, पंतप्रधान यांनी व्यक्त केले दुःख
आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, खासदार सुप्रिया सुळे यांनी दुःख व्यक्त केले. तर पंतप्रधान मोदींनी मृतांच्या वारसांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
5 लाख अर्थसाह्य
तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगीत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली. त्याचसोबत मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये अर्थसाह्य देण्याची घोषणा केलीय. आगीचे नेमके कारण काय हे अद्यापही समजलेले नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. मात्र सोलापूर शहर विभागाचे कार्यकारी अभियंता आशिष मेहता म्हणतात की, घटनेची माहिती मिळताच तातडीने वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. शॉर्टसर्किटमुळे ही घटना घडली नाही. लवकरच इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर पाहणी करतील मगच खरे कारण समोर येईल, असं मेहता म्हणाले.
Leave a Reply