ठाणे जिल्ह्यातील मुंबई-नाशिक महामार्गावर रविवारी सकाळी कसारा घाटात खासगी मिनी बस उलटल्याने दहा जण जखमी झाले असून, यातील चौघांची प्रकृती गंभीर आहे. अपघात झालेल्या बसमध्ये जवळपास २० प्रवासी होते. हे सर्व प्रवासी मुंबईतील कफ परेड येथून नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे लग्नसमारंभासाठी जात होते.
कसारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश गावित यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सुमारे नऊ वाजता चिंतामणवाडी वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले, त्यामुळे बस उलटली. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने शहापूर व आजूबाजूच्या खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.
यातील चार जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघातामुळे प्रवाशांमध्ये भीती पसरली असून पोलिसांनी घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे. कसारा घाटात अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी चालकांना गती मर्यादा पाळण्याचे आणि घाटातील वळणांवर काळजीपूर्वक वाहन चालविण्याचे आवाहन केले आहे.

कसारा घाटात मिनी बस उलटली; दहा जण जखमी, चौघांची प्रकृती गंभीर
•
Please follow and like us:
Leave a Reply