आजकाल कुणालाही महामंडलेश्वर बनवतात! ममता कुलकर्णीवर बाबा रामदेव संतापले

अभिनेत्री ममता कुलकर्णी गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनली आहे. त्याचं कारण म्हणजे, आरामदायी आयुष्य मागे सोडून ममताने संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. २४ वर्षांपासून बॉलिवूड आणि भारतापासून दूर असलेली ममता अचानक भारतात परतली आणि महाकुंभात किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनली. यामुळे तिच्यावर टीका होऊ लागली आहे. दरम्यान, योगगुरू बाबा रामदेव यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
मीडियाशी संवाद साधताना बाबा रामदेव यांनी कुंभमेळ्यात रील्स बनवण्याच्या नावाखाली पसरवल्या जाणाऱ्या अश्लिलतेबद्दल नाराजी व्यक्त केली. यासोबतच कोणीही एका दिवसात संत होऊ शकत नाही, यासाठी अनेक वर्षांची साधना करावी लागते, असेही म्हटले आहे. त्यांचा हा टोला अभिनेत्री ममता कुलकर्णीवर होता.
बाबा रामदेव पुढे म्हणाले, “अचानक काहीजण महामंडलेश्वर बनतात. नावापुढे ‘बाबा’ जोडल्याने कोणताही व्यक्ती साधू-संत होऊ शकत नाही. रील्सच्या माध्यमातून चुकीच्या माहितीचा प्रसार करणे योग्य नाही. खरा कुंभ तो आहे जिथे मानवतेपासून देवत्व, ऋषीत्व आणि ब्रह्मत्वाकडे जाऊन उत्कर्ष साधला जातो. स्नान, ध्यान, योगाभ्यास, सत्य, प्रेम, करुणा, ध्यान योग, भक्ती योग आणि कर्मयोग, हेच खरे योगाचे तत्त्व आहेत.”
त्यांनी सुचवले की, “सनातन म्हणजे केवळ शब्दांचे उच्चारण नाही. सनातन म्हणजे शाश्वत सत्य जे कधीही नाकारता येत नाही.” ममता कुलकर्णीबद्दल विचारल्यावर बाबा रामदेव म्हणाले, “कोणीही एका दिवसात संत होऊ शकत नाही. त्यासाठी तपश्चर्या आणि साधना लागते. आम्हाला संतपद मिळवण्यासाठी ५०-५० वर्षांची साधना लागली. संत होणे हे मोठं कार्य आहे, आणि महामंडलेश्वर होणं हे एक अत्यंत प्रतिष्ठित स्थान आहे. आजकाल मात्र कुणालाही महामंडलेश्वर बनवले जात आहे, हे योग्य नाही.”

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *