काँग्रेस नेत्या आणि मुंबई उत्तर-मध्यच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्या निवडीला दिलेले आव्हान उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळले. भाजप उमेदवार वकील उज्ज्वल निकम यांच्याविरोधात झालेल्या लढतीत गायकवाड यांनी १६,५१४ मतांनी विजय मिळवला होता. मात्र, निवडणूक प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत अपक्ष उमेदवार आसिफ सिद्दीकी यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
याचिकेतील आरोप आणि न्यायालयाचा निर्णय
सिद्दीकी यांनी केलेल्या याचिकेत दावा करण्यात आला होता की, गायकवाड यांनी निवडणूक प्रचारात वापरलेल्या जाहिरातपत्रकांवर मुद्रक आणि प्रकाशकांची नावे नमूद केली नव्हती, जे नियमांचे उल्लंघन आहे. तसेच, गायकवाड यांनी खोटी आश्वासने देऊन मतदारांची दिशाभूल केली, असा आरोप देखील करण्यात आला होता. मात्र, न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या एकलपीठाने या सर्व आरोपांना कोणताही ठोस पुरावा नाही, असे सांगत याचिका फेटाळली.
मतदारांना पैसे वाटपाचा आरोपही फोल ठरला!
गायकवाड यांनी मतांच्या बदल्यात पैसे वाटल्याचा दावा करत, याचिकाकर्त्याने न्यायालयात एक ध्वनिचित्रफीतही सादर केली होती. मात्र, ती फुटेज विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी यांची असून त्यांचा गायकवाड यांच्याशी कोणताही संबंध नाही, असे गायकवाड यांच्या वकिलांनी स्पष्ट केले. त्यामुळे या आरोपालाही न्यायालयाने दुजोरा दिला नाही.
गायकवाड यांचा न्यायालयात ठाम पवित्रा
गायकवाड यांनी याचिकेत मांडण्यात आलेले सर्व आरोप निराधार असल्याचे ठामपणे सांगितले. त्यांनी कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले नसून, निवडणुकीत पारदर्शकता राखली गेली, असा युक्तिवाद केला. न्यायालयानेही हा युक्तिवाद मान्य करत याचिका फेटाळल्याने गायकवाड यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Leave a Reply