शास्त्रीय संगीतातील जेष्ठ गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचं काल ,१२ फेब्रुवारी रोजी दुःखद निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. धारदार आवाजात रसाळपणे नाट्यपदे, संतांचे अभंग सादर करत रसिकांची वाहवा मिळवत लोकप्रिय झालेले कारेकर बुवा यांच्या जाण्याने संगीत रसिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. नभ मेघांनी आक्रमिले, बोलावा विठ्ठल.. पाहावा विठ्ठल, करिता विचार सापडले वर्म, वक्रतुंड महाकाय अशा गाजलेल्या गाण्यांसह ठुमऱ्या, नाट्यपदं सुरेल आणि गायनातील रंजकतेनं सादर करण्यासाठी पं प्रभाकर कारेकर प्रसिद्ध होते.
उत्कृष्ट शास्त्रीय संगीत गायक, शास्त्रीय संगीताबरोबरच सुगम आणि फ्युजन संगीतातही वैशिष्ठ्यपूर्ण काम, उत्कृष्ट शिक्षक अशी बहुआयामी प्रतिभा लाभलेले पंडित प्रभाकर कारेकर जेव्हढे उत्तम गायक होते, तेव्हढेच चांगले व्यक्ती होते.
माझी त्यांच्या सोबतची एक पस्तीसेक वर्षापूर्वीची आठवण आज येथे सांगावीशी वाटते. अशाच एका धार्मिक कार्यक्रमात, ठाण्यातील प्रसिद्ध सामाजिक व्यक्तिमत्व यशवंत तथा अण्णा आशिनकर यांच्या घरी बहुतेक गजानन महाराज यांच्या प्रकट दिनी, पंडित प्रभाकर कारेकर यांच्या मैफलीचे आयोजन केलं होतं. अण्णा आशिनकर यांच्या पत्नीची आणि आमच्या सौ सुगंधा वाहिनी यांची मैत्री असल्यामुळे आई, दादा, वाहिनी, मी आम्ही सगळे सकाळीच वाड्याहून ठाण्यात पोहचलो होतो. संध्याकाळी कारेकर बुवा यांच्या मैफिलीला सुरुवात झाली… संध्याकाळच्या उतरतीच्या सुवर्ण रंगानी यमन कल्याणच्या स्वरांना उजळून काढलं होतं… आयुष्यात पहिल्यांदा शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत, अगदी गायकाच्या पुढ्यात बसलेला मी त्या विलक्षण अनुभवाने थरारून गेलो होतो… मैफिल रागांच्या रंगातून पांडुरंगाच्या नामस्मरणात जशी गुंग होत गेली… तसे नादब्रह्म आणि परब्रह्म एक होताना दिसले… आशिनकर अण्णांच्या घरात पंढरपूर अवतरले होते… मैफिल संपली, काही घरातील माणसं रेंगाळत होती. तेव्हढ्यात, संधी साधून मी कारेकर बुवांच्या समोर गेलो. जरा घाबरतच म्हणालो, “तुम्ही खूप छान गायला… पण” प्रसन्न हसत, ते आश्चर्याने उद्गारले, “पण काय ?” मी म्हणालो, ” आपण जे गायला, ते राग मला समजत नव्हते. मला राग ओळखता सुद्धा येत नाही.” त्यावर ते सहजपणे म्हणाले, “म्हणून काय झाले, तुम्हाला आनंद तर मिळाला ना ?” मी हो, म्हणालो. यावर थोडे सावरून बसत, ते म्हणाले, “तू कुठे राहतोस, वडील काय करतात” मी उत्तरलो, मी ठाण्याचा नाही. माझं गाव आहे वाडा, इथून ६२ किलोमीटर अंतरावर. वडील शेती करतात.” त्यावर त्यांनी विचारले, “घरी आंब्याची झाडे आहेत का?” मला त्या प्रश्नाने आश्चर्य वाटले. मी म्हणालो, ” हो, ” त्यावर ते म्हणाले, आंब्याला जेव्हा फळे येतात, तेव्हा तुझ्या वडीलांना त्या झाडाचे सर्वार्थाने संरक्षण करण्याची चिंता असते. तशी तुला असते का?” मी म्हणालो , नाही, “मी तर जेव्हढ्या कैऱ्या पाडता येतील, तेव्हढ्या पाडून घरी आणतो.” ते खळखळून हसले. आणि विचारते झाले, ” आंबे पिकल्यावर कोण जास्त खातं?”
मी तत्काळ उत्तरलो, “अर्थात मी”. थोडे मागे रेलत कारेकर बुवा उत्तरले, ” बघा, तुम्हाला आंब्याच्या झाडाची काळजी घ्यायची किंवा संरक्षण करण्याची कोणतीच जबाबदारी नाही. पण तुम्ही कच्च्या कैऱ्या किंवा पिकलेले आंबे मात्र मनसोक्त खाऊन मजा करता. बरोबर ना… शास्त्रीय संगीताच्या रागदारीचा, शैलीचा, घराण्याचा सतत विचार करणारे श्रोते हे, तुमच्या वडिलांसारखे, आंब्याच्या झाडाची काळजी घेणारे लोकं असतात. आणि राग, घराणे, इत्यादी तांत्रिक बाबीचा विचार न करता, संगीताचा निखळ आनंद लुटणारे श्रोते, तुमच्यासारखे असतात. त्यामुळे, तुम्हाला जर रागांची नावं ठाऊक नसतील, तर काही फरक पडत नाही. तुम्ही आपला आमरसाचा, स्वर रसांचा आनंद घेत राहा…” पंडित प्रभाकर कारेकर यांनी आयुष्याच्या पहिल्याच टप्प्यावर केलेले हे मार्गदर्शन आयुष्यभर उपयोगी पडले.
आज बुवांच्या निधनाने ती पहिली मैफल आणि त्यांच्या सोबतचा संवाद आठवला… मन उदास झालं. पण युट्यूब वर त्यांच्या पल्लेदार आवाजातील “बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव” हा संत तुकाराम महाराज यांचा अभंग ऐकला आणि मन अपूर्व शांतीने भरून गेले…
पंडित प्रभाकर कारेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
महेश म्हात्रे
महाराष्ट्र रिसर्च सेंटर
Leave a Reply