केसरीभाऊंचे वेगळेपण सांगणारा महेश म्हात्रे यांचा विशेष लेख
“केसरी टूर्स”चे संस्थापक – अध्यक्ष केसरीभाऊ पाटील यांचे आज पहाटे वृद्धापकाळामुळे निधन झाले. महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसायाला प्रतिष्ठा मिळवून देणारे एक धडाडीचे उद्योजक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या निधनाने देशातील पर्यटन व्यवसायाची फार मोठी हानी झाली आहे.
पालघर तालुक्यातील मथाणे गावातील केसरीभाऊ हे “केसरी परिवारा”चे शिल्पकार होते. सुरुवातीला कोसबाडला शिक्षक म्हणून काम करणारे हे महत्त्वाकांक्षी व्यक्तिमत्व पुढे त्यांचे बंधू, “राजा – राणी टूर्स”चे राजा पाटील यांच्या सोबत कार्यरत होते. पर्यटन व्यवसायाची पुरेशी माहिती झाल्यावर वयाच्या ५० वर्षी त्यांनी “केसरी टूर्स” ची स्थापना केली. आपली पत्नी सुनीता आणि एक सहकारी यांच्या साथीने, छोट्याशा खोलीत त्यांनी केसरी टुर्स ची सुरुवात केली होती. बारा लोकांना घेऊन केलेली राजस्थानची सहल, हे त्यांचे पहिले काम होते. अल्पावधीतच त्यांनी, सचोटी, नाविन्याचा शोध आणि धाडसी वृत्तीच्या जोरावर त्यांनी केसरीला एक जगविख्यात कंपनी म्हणून नावारूपास आणले. भेटायला आलेल्या प्रत्येकाला प्रेमाने मार्गदर्शन करणारे केसरीभाऊ एक दिलखुलास व्यक्तिमत्व होते. म्हणून त्यांना पर्यटन क्षेत्रातील विद्यापीठ म्हणून संबोधले जायचे.
माझे घर आणि केसरीचे मुख्य कार्यालय शेजारी – शेजारी असल्यामूळे केसरी भाऊंची सतत भेट होत असे. सार्वजनिक कार्यक्रमातही सुंदर सूट – बूट घालून, आनंदी चेहऱ्याने वावरणाऱ्या केसरी भाऊंची उपस्थिती वातावरण प्रसन्न करून टाकत असे.
त्यांच्याशी होणारी प्रत्येक भेटीत आमच्या गावाचा, पालघर, वाड्यातील घडामोडींचा उल्लेख होई. कुटुंबाची चौकशी होई. पत्रकारितेविषयी बोलणे होतअसे… त्यांची मुले, मुली यांच्या कर्तृत्वाचा त्यांना अभिमान होता. पण जेव्हा केसरी टूर्स मध्ये व्यावसायिक वाद झाले, तेव्हा त्यांनी हताश न होता, मोठ्या कौशल्याने त्यातून मार्ग काढला होता. ती त्यांची खासियत होती. त्या संदर्भात बोलताना ते सहजपणे फार सुंदर वाक्य उद्गारले होते, ” जसे गुजराती, मारवाडी समाजात, कुटुंबाला महत्व दिले जाते, एकमेकांना सांभाळले जाते, तसे जेव्हा मराठी लोक करायला लागतील. तेव्हा मराठी माणसे उद्योगात यशस्वी होतील. आणि त्यांचे उद्योग पिढ्यानपिढ्या सुरू राहतील.”
केसरी भाऊंच्या जाण्याने असा दूरदृष्टीने विचार करणारे, वडीलधारी व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेले आहे…
त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली.
महेश म्हात्रे
संपादक – संचालक
महाराष्ट्र रिसर्च सेंटर
Leave a Reply