तब्बल २७ वर्षांनंतर भारतीय जनता पक्षाने (भाजपा) दिल्लीच्या सत्तेत पुनरागमन केले असून, पक्षाने रेखा गुप्ता यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली आहे. त्या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत. यापूर्वी सुषमा स्वराज (भाजपा), शीला दीक्षित (काँग्रेस), आणि आतिशी (आम आदमी पक्ष) यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती.
दिल्लीतील नवनिर्वाचित भाजपा आमदारांच्या बैठकीत रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्या शालीमार बाग विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत आणि ही त्यांची पहिलीच आमदारकीची टर्म आहे. रेखा गुप्ता यांचा जन्म १९४७ मध्ये हरियाणातील जिंद जिल्ह्यात झाला. त्यांचे कुटुंबीय त्या दोन वर्षांच्या असतानाच दिल्लीला स्थायिक झाले. त्यांचे वडील स्टेट बँकेत व्यवस्थापक होते, तर त्यांनी स्वतः एलएलबीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यांचे संपूर्ण शिक्षण दिल्लीमध्येच झाले आहे.
विद्यार्थीदशेतच राजकारणात प्रवेश
कॉलेजमध्ये असतानाच त्यांचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) संपर्क आला, आणि त्या सक्रिय कार्यकर्त्या बनल्या. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सचिवपदाची जबाबदारीही पार पाडली. तसेच, त्या दिल्ली भाजपाच्या सरचिटणीस आणि भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष राहिल्या आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शालीमार बाग मतदारसंघातून विजय मिळवत, आम आदमी पक्षाच्या वंदना कुमारी यांचा पराभव केला. या निवडणुकीत रेखा गुप्ता यांना ६८,२०० मतं मिळाली, तर वंदना कुमारी यांना ३८,६०५ मतं मिळाली होती.
मुख्यमंत्रीपदी निवडीमागे कोणता महत्त्वाचा घटक?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) सूचनेनंतरच रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जाते. संघानेच महिला मुख्यमंत्री देण्याचा प्रस्ताव मांडला होता, आणि भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने तो मान्य केला. त्यानंतर त्यांच्या नावाची आमदारांच्या बैठकीत अधिकृत घोषणा करण्यात आली. रेखा गुप्ता बुधवारी, २० फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या निवडीमुळे दिल्लीच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Leave a Reply