अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन (SEC) ने भारतीय उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्यावर सिक्युरिटीज फसवणूक आणि २६५ दशलक्ष डॉलर्सच्या कथित लाचखोरी प्रकरणात कारवाई करण्यासाठी भारताच्या कायदा मंत्रालयाला पत्र पाठवले आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन ने न्यूयॉर्क जिल्हा न्यायालयात मंगळवारी दाखल केलेल्या याचिकेत सांगितले की, या दोघांविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी ते आवश्यक पावले उचलत असून भारतीय अधिकाऱ्यांची मदत घेत आहेत.
नोव्हेंबर २०२४ मध्ये सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन ने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने सप्टेंबर २०२१ मध्ये दिलेल्या कर्ज ऑफरशी संबंधित दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप आहे. तसेच, न्यूयॉर्कच्या पूर्व जिल्ह्यातील न्यायालयात अदानींविरोधात कट रचणे आणि सिक्युरिटीज फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनच्या म्हणण्यानुसार, अदानी भारतात असल्यामुळे त्यांच्यावर तक्रार दाखल करण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे आणि यासाठी भारताच्या कायदा मंत्रालयाची मदत घेतली जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १९७७ च्या परदेशी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याला १८० दिवसांसाठी स्थगिती दिली असली तरी, त्याचा पूर्वलक्षी परिणाम होणार नसल्याचे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनच्या दाखल केलेल्या नव्या अर्जावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अदानी समूहाविरोधातील सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनची चौकशी कायम राहण्याची शक्यता आहे.
भारतीय अधिकाऱ्यांकडून सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनच्या तक्रारीचा आढावा घेतला जात असून, त्याआधी कोणतीही ठोस कारवाई केली जाणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनच्या या कारवाईनंतर मंगळवारी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स ४% घसरले, अदानी एंटरप्रायझेस २% खाली गेले, अदानी पॉवर ०.५%, अदानी एनर्जी सोल्युशन्स १%, अदानी पोर्ट्स ०.३% घसरले. शेअर बाजार विश्लेषक अरुण केजरीवाल यांनी सांगितले की, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनच्या कारवाईमुळे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठ्या व्यापाऱ्यांसाठी संधी निर्माण झाली, परंतु लहान गुंतवणूकदारांना मोठे नुकसान सहन करावे लागले.
अमेरिकेच्या दौर्यावर असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अदानी प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “हे प्रकरण वैयक्तिक असून, त्यावर ट्रम्प यांच्यासोबत कोणतीही चर्चा झाली नाही.” या प्रकरणावर भारतीय प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन कडून अदानी समूहाविरोधात भारताला तक्रार दाखल करण्याची सूचना
•
Please follow and like us:
Leave a Reply