तालुक्यातील वडवली गावातील चार मोठे प्रदूषणकारी कारखाने बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. याशिवाय दोन कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस, तर एका कारखान्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. मंडळाच्या या धडक कारवाईने उद्योजकांमध्ये खळबळ उडाली आहे.
टायर जाळण्यामुळे गंभीर प्रदूषण
वडवली ग्रामपंचायत हद्दीत अनेक कारखान्यांत जुने टायर जाळून त्यापासून ऑइल व तारा वेगळे करून विक्री केली जाते. मात्र, यामुळे मोठ्या प्रमाणात वायू व जलप्रदूषण होत असूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता. कारखान्यांतून निघणारे रासायनिक सांडपाणी थेट नाल्यात सोडले जात असल्याने माशांचा मृत्यू झाल्याच्या तसेच जनावरांनी दूषित पाणी प्यायल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
चार कारखान्यांना थेट बंदीचे आदेश
अखेर वाढत्या प्रदूषणाच्या तक्रारींवर कारवाई करत एम. डी. पायरोलिसेस, के. जी. एन. इंडस्ट्रियल, सन इंडस्ट्रियल आणि क्रेससेंट वेस्ट रिसायकलिंग या चार कारखान्यांना उत्पादन त्वरित बंद करण्याचे आदेश गुरुवारी (ता. २०) जारी करण्यात आले. काही दिवसांपूर्वी एम. डी. पायरोलिसेस या कंपनीत बॉयलर स्फोट झाल्याने संपूर्ण कंपनी जळून खाक झाली होती. या दुर्घटनेत दोन कामगारांसह त्यांच्या मुलांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि कल्याण येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी डॉ. आर. ए. रजपूत यांनी प्रदूषणकारी कारखाने बंद करण्याचे आदेश दिले.
गेल्या तीन वर्षांपासून वडवलीतील नागरिक हे प्रदूषणकारी कारखान्यांच्या त्रासाने त्रस्त होते. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. अखेर पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात स्थानिकांनी ही व्यथा मांडताच, त्यांनी तातडीने प्रदूषण नियंत्रण मंडळाला कारवाईचे आदेश दिले. या आदेशांच्या अनुषंगाने अखेर कारखान्यांवर बडगा उगारण्यात आला.
एम. डी. पायरोलिसेस दुर्घटनेत कामगार आणि त्यांच्या मुलांचा बळी गेला. या घटनेला कारखान्याचा मालक तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळातील अधिकारी आणि कर्मचारीही जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.
स्थानिकांचे म्हणणे आहे की, प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेळेवर योग्य कारवाई केली असती, तर या निष्पाप जिवांचे प्राण वाचले असते.

टायर रिसायकलिंग करणाऱ्या कंपन्यांमुळे हवा दूषित, वाड्यातील चार प्रदूषणकारी कारखाने होणार बंद
•
Please follow and like us:
Leave a Reply