राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका महत्त्वाच्या राजकीय गौप्यस्फोट केला आहे. १९९९ साली अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार संसदेत विश्वासदर्शक ठरावात पराभूत झाले होते. अवघ्या एका मतामुळे वाजपेयी सरकारला राजीनामा द्यावा लागला होता, आणि त्या घटनेत पवार यांनी आपला मोठा सहभाग असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
दिल्लीतील एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी २६ वर्षांपूर्वी घडलेल्या या महत्त्वपूर्ण घटनेचा उलगडा केला. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आयोजित अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला निलेशकुमार कुलकर्णी यांच्या ‘संसद भवन ते सेंट्रल विस्टा’ या मराठी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमात शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार संजय राऊत देखील उपस्थित होते.
शरद पवार यांनी जुन्या संसद भवनाच्या आठवणींचा उल्लेख करत १९९९ साली घडलेल्या त्या ऐतिहासिक घटनेवर प्रकाश टाकला. तेव्हा अटलबिहारी वाजपेयी सरकारविरुद्ध लोकसभेत अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. त्यावेळी पवार काँग्रेसमध्ये होते आणि विरोधी पक्षनेते म्हणून ते सक्रिय होते. पवार म्हणाले, “मी त्यावेळी विरोधी पक्षनेता होतो, हे अनेकांना आठवत नसेल. आम्ही वाजपेयी सरकारविरुद्ध संसदेत अविश्वास ठराव दाखल केला होता. त्या ठरावावर चांगलीच चर्चा झाली होती. मतदानापूर्वी आठ ते दहा मिनिटांचा ब्रेक घेतला गेला. मी त्या वेळी संसदेच्या बाहेर ‘चर्चेसाठी’ गेलो होतो.”
पवार पुढे म्हणाले, “आम्ही परत आल्यावर मतदान झालं आणि सत्ताधारी पक्षाच्या एका खासदाराने विरोधकांच्या बाजूने मतदान केलं. त्यामुळे वाजपेयी सरकार अवघ्या एका मताने पडलं. आम्ही हे कसं केलं, हे सांगणार नाही.” १७ एप्रिल १९९९ रोजी लोकसभेत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सरकारविरुद्ध अविश्वास ठरावावर मतदान झालं. त्या मतदानात वाजपेयी सरकारला २६९ मतं मिळाली, तर विरोधात २७० मतं पडली, ज्यामुळे सरकार केवळ एका मताने पराभूत झालं. त्यानंतर वाजपेयींनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. आणि नंतर, विरोधी पक्षांना आवश्यक खासदारांची संख्या मिळवता आली नाही, ज्यामुळे १९९९ साली पुन्हा एकदा लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या.

१९९९ साली वाजपेयी सरकार मीच पाडलं’, शरद पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
•
Please follow and like us:
Leave a Reply