#पार्वतीपती #शंकर हे भारतीय जीवनातील , तत्वज्ञानातील अफाट आणि अचाट व्यक्तिमत्व. लहानपणी आईच्या तोंडून ऐकलेलं , ” #कैलासराणा_शिवचंद्रमौळी_फणींद्रमाथा_भ्रुकुटीझळाळी
#कारुण्यसिंधो_भवदुखहारी_तुजवीण_शम्भो_मजकोण_तारी” हे आर्त आर्जव स्वीकारून कोणाच्याही मदतीला धावणारा , अगदी रावणासारख्या भक्तालाही मनोभावे पावणारा शुभंकर शंकर प्रत्यक्षात जगाचा विनाश करण्याचे सामर्थ्य असूनही सामान्य लोकांच्या मनात आजही घर करून राहतो , शिवाच्या या मनोवेधक गुणांचा #महाशिवरात्री च्या निमित्ताने
#महेश_म्हात्रे यांनी घेतलेला मागोवा.
ज्याला शिव किंवा आद्यपुरुष म्हणून ओळखले जाते असा भारतीय लोकजीवनाचा सर्वोच्च मानबिंदू असणारा भोळा शंकर, त्याने आज अवघ्या सोशल मीडियावर भलतेच गारुड केलेले दिसतंय. सकाळपासून ‘महाशिवरात्रीच्या शुभेच्छा’ देणाऱ्या लोकांच्या ‘फॉरवर्ड’ संदेशांची फेसबुक, व्हाटस ऍप आदी ठिकाणी अक्षरश: बरसात होतेय.
अनेक युगे आली आणि गेली , समाज, संस्कृती , परंपरा आणि राजवटी बदलत गेल्या पण शिवशंकराचा भारतीय जनमानसावरील प्रभाव कायम टिकून आहे, त्याचेच तर हे लक्षण नसावे ना , असा प्रश्न आपल्या मनात येणे साहजिकच आहे.
भारतीय दैवतांचा दरबार हा विविध संस्कृतिसंमुच्चयातून , सामाजिक अभिसरणातून घडत , फुलत गेलेला आहे. अनेक सामाजिक प्रवाह पोटात घेणारी भारतीय लोकगंगा विविध संगमांवर आपल्याला विविधरंगी नटलेली दिसते. तद्वत दैवतांचे समूह नवनव्या सामाजिक संगराच्या आणि संकराच्या टप्प्यांवर नूतन प्रतीकचिन्हांच्या सजावटीने सजलेले दिसतात.
तसे पाहायला गेल्यास शिवशंकर या आदिम दैवताचे समाज मनातील स्थान वेगवेगळ्या कथा-काव्यांमध्ये हजारो वर्षांपासून प्रतिबिंबित होताना दिसते. पण हाच शंकर वैदिक वाङ्मयात पाहायला मिळत नाही . याची कारणमीमांसा सोदाहरण सांगून भारतातील आर्य-अनार्य , आदिम , भटके ,शेतकरी, नागरी या समूहांचे जगणे हजारो वर्षात कसे बदलले आणि त्यामुळे त्यांच्या देवता कशा उन्नत, अवनत, भ्रष्ट वा नष्ट होत गेल्या याची मांडणी नव्या पिढीसमोर झाली पाहिजे . दुर्दैवाने तसे काही होत नाही, जर कुणी केलेच तर राजकारण करणारी लबाड मंडळी त्या अभ्यासाला आजच्या संदर्भात घुसडून नवेच गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात… परिणामी सुबक सांस्कृतिक घडण वा सुघड सामाजिक गुंफण नवीन पिढीला दाखवण्या ऐवजी सोप्या, प्रचलित गोष्टींचेच स्तोत्र -स्तोम गाण्यात धन्यता मानली जाते.
विख्यात गणिती आणि प्राचीन इतिहासाचे प्रतिभावंत अभ्यासक दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी आपल्या “पुराणकथा आणि वास्तवता” या अत्यंत महत्वाच्या ग्रंथात हा सांस्कृतिक अभिसरणाचा विषय खूप थेटपणे मांडला आहे. आधुनिक ज्ञान-तंत्रज्ञानाचा पुरस्कार करणारे डी डी कोसंबी या सगळ्या विषयावर म्हणतात , ” भारतीय धार्मिक तत्वज्ञानाची मुळे आदिम समाजव्यवस्थेत आहेत हे मान्य करण्याची आणि आदिम कालातून टिकून राहिलेल्या श्रद्धांचे अस्तित्वास सामोरे जाण्यास असणारी भारतीय विचारवंतांची स्वाभाविक नाखुषी ही बहुदा (मोगल-इंग्रजांच्या) साम्राज्यशाही काळात सहन कराव्या लागलेल्या आणि आजही जिची स्मृती जिवंत आहे अशा दडपशाहीची सहज प्रक्रिया असणे शक्य आहे. ” असो, तर या वैचारिक जंजाळाला तूर्तास बाजूला ठेवून आपण हा भोळा शंकर तुमच्या-माझ्या भारतीय भावविश्वाला कसा कवटाळून बसलाय ते पाहू या.
भारत स्वतंत्र होण्यापूर्वी जवळपास सर्वच राजकीय नेते, अगदी लोकमान्य टिळक यांच्यापासून महात्मा गांधी, राजेंद्र प्रसाद आदी नेत्यांना धर्म आणि धर्मग्रंथां विषयी आपली मते मांडायची मुभा होती. अगदी सर्वच विचारधारेचे नेते धर्म आणि परंपरादी विषयांवर मोकळेपणानं बोलत.
पंडित राम मनोहर लोहिया यांच्यासारख्या समाजवादी विचारवंत-राजकारणी नेत्यालाही राम , कृष्ण आणि शिव यांच्या त्रिमिती प्रतिमेने भारताचे वेगळे दर्शन घडवले होते. त्या तिन्ही पुराणपुरुषांची, जे प्रत्यक्षात होऊन गेले होते की नाही या शंकेचे आजवर निरसन झालेले नाही, असे बोलत लोहियाजी त्या तीन देवतांची गौतम बुद्ध या अडीच हजार वर्षांपूर्वी देश भ्रमण केलेल्या प्रभावशाली दार्शनिक प्रेषितासोबत तुलना करतात आणि बुद्धापेक्षा हे तीन देव आणि त्यांच्या समूहातील देवी-देवतांचा भारतीय समाजमनावर राजकीय अंगाने कसा पगडा आहे , याचे मनोरंजक विश्लेषण करतात. साधारणतः: पन्नासच्या दशकात लोहियाजींनी केलेले हे विश्लेषण त्यांच्या अर्थवाही हिंदीमधून वाचणे हा अभ्यासकांसाठी एक आनंददायी अनुभव असतो… आज त्याच लोहियाजींचे नाव घेऊन उत्तर प्रदेश वा बिहारमध्ये राजकारण करणारे “लोहिया विचार” पार विसरून गेले आहेत, तो भाग वेगळा. तसं पाहिलं तर ही बाब देशातील सगळ्याच राजकीय पक्षांना लागु पडेल.
शंकर हा देव तसाच अनिकेत , असीमित, आनंदी आणि आनंददायी. त्याचे जगणे , वागणे , रमणे सगळंच मोकळं ढाकळं . तो अनिकेत आहे, म्हणजे घर नसलेला , किंवा अवघे विश्व हेच ज्याचे घर असा विश्वंभर शिव. तो असीमित आहे. कारण एका दंतकथेनुसार ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात जेव्हा श्रेष्ठत्वाची लढाई लागली होती , त्यांना शिवाने आपली लांबी-रुंदी मोजून या, जो प्रथम येईल तो श्रेष्ठ , असे सांगून ‘कामाला लावले’ होते, त्यांना शिवाच्या मोठेपणाचा थांग अजूनही लागला नाही , मग सामान्य जनांची काय कथा, म्हणून शिव असीमित आहे. मला राम , कृष्णापेक्षा शिव भलता आकर्षक वाटतो. शिव दिसायला देखणा आहे, रामदासांच्या शब्दात सांगायचे तर, तो “कर्पूरगौरा भोळा , नयनी विशाळा ” असा हलाहल विष पिऊन पचवणारा , सर्वस्पर्शी मदनालाहि मारणारा महापराक्रमी शिव वृत्तीने मात्र साधा-भोळा आहे. आर्थिकदृष्ट्या गरीब आहे, “स्मशानवासी देवदिगंबर”, सर्प- विंचू , लुळे-पांगळे , नशेबाज-गंजेडे , गुरे-ढोरे, गोरगरीब अशा गावकुसाबाहेर फेकलेल्यांच्यात रमणारा महायोगी अशी ओळख असणारा. तो राजकन्या पार्वतीच्या प्रेमाने, व्रतस्थ सतीच्या तपश्चर्येने , अवखळ उमेच्या हट्टाने वारंवार संसारात पडतो आणि संधी मिळताच ध्यानधारणेच्या निमित्ताने संसारापासून पळतोही. त्याचे रांगडे भोळेपण, आदिमकाळापासून भारतीय स्त्रियांना भुलवणारे असावे, पार्वतीचा हरेक हट्ट पुरवण्यासाठी चालणारी त्याची तडफड भारतीय मुलींना भुरळ पाडत असावी, अन्यथा पिढ्यानपिढ्या “हरतालिका व्रत” करून शिवसारखा पती मिळावा अशी कामना लेकीबाळींनी का केली असती ? सासर्याच्या, राजा दक्षाच्या यज्ञात पार्वतीचा अपमान होणे आणि त्यात तिचा जीव जाणे याने तो फक्त व्यथित नाही होत तर , मृत पत्नीचे कलेवर खांद्यावर घेऊन अस्वस्थपणे देशभर फिरतो, मग त्या भ्रमणात जेथे जेथे पार्वतीचा एकेक अवयव पडतो तिथे मंदिर आणि तीर्थक्षेत्र उभे राहते… सोबत ऐकू येतात असंख्य लोककथा. त्या एकेक कथेतून फुललेल्या अनेक पैलूंच्या प्रभावामुळे शिव आपल्या मन-संस्कारात रुजलेला आहे. शिवासोबत प्रकृती वा शक्ती स्वरूपिणी उमासुद्धा , ज्ञानेश्वर माउलींच्या शब्दात , “चंद्र तेथे चंद्रिका । शंभू तेथे अंबिका “, या न्यायाने त्याच्यासोबत असतेच.
त्यामुळेच असेल कदाचित आपल्याकडे प्रकृती – पुरुष , शिव – शक्ती या तत्वांची सामान्य स्त्री – पुरुषांमध्ये सहजपणे प्रतिष्ठापना झाली असावी. एका फ्रेंच समाजशास्त्रद्याने शिवशंकराबद्दल लिहिताना एक मस्त उपमा वापरली आहे, “नॉन डायमेन्शनल मिथ “, शंकर म्हणजे लांबी-रुंदी अशा कोणत्याच मापांमध्ये नबसणारी, असीमित दैवतकथा आहे. जी आजही नव्या पिढीला कोणत्या ना कोणत्या अंगाने स्पर्श करतेच.
प्राकृत भाषेत मराठी लोकजीवनाचे यथार्थ चित्रण करणारा आद्यग्रंथ म्हणजे गाथा सप्तशती. या साधारणतः सतराशे वर्ष जुन्या अशा ग्रंथामध्ये कविमनाच्या सातवाहन राजवंशातील विद्वान हाळ राजाने सातशे काव्यकथा प्रसिद्ध केल्या आहेत. विशेष म्हणजे या ग्रंथाचा आरंभ आणि शेवट शंकर – पार्वतीच्या उत्कट प्रेमाच्या गाथांनी होतो. मुख्य म्हणजे , त्या समग्र गाथा काव्याने स्वीकारलेली सामान्य लोकांच्या जीवनदर्शनाची अद्भुत रीत शिव-पार्वतीच्या काव्यातही तेव्हढ्याच उत्कटतेने व्यक्त होते. आजपासून सतराशे- अठराशे वर्षांपूर्वी आमचे पूर्वज भावना व्यक्त करताना किती तरलपणे विचार करीत होते, खासकरून गावखेड्यातील लोकसुद्धा निसर्गाच्या निकट सान्निध्यामुळे कसे काव्यमय , सूचक पद्धतीने बोलत हे समजून घेण्यासाठी हाळ राजाने साठवलेला हा रत्नसंभार पहायला हवा, एकेक गाथेतून तो खजिना झळाळून उठतो.
सप्तशती गाथेचा आरंभ , “उगवत्या सूर्याला अर्ध्य देण्यासाठी पशुपतीने ओंजळीत पाणी घेतले आहे, ( मला सोडून हे कोणाचे ध्यान करीत आहेत अशा संशयाने ) रागाने लाल झालेल्या गौरीचा मुखचंद्र त्या जलात प्रतिबिंबित झाल्यामुळे ज्याने जणू आरक्त कमळासह अर्ध्य धारण केले आहे त्या पशुपतिला नमन असो.” असा होतो ज्यात पार्वतीचा , खरेतर कोणत्याही प्रिय पत्नीचा पराक्रमी-देखण्या पतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन उमटलेला आहे. तर शेवटच्या गाथेत सुखांत गोड शब्दात करण्यासाठी कविवत्सल हाळ राजाने योजलेली कल्पना लावण्यमनोहर आहे, ” मावळत्या सूर्याला अर्ध्य देण्यासाठी ओंजळीत घेतलेल्या जलात गौरीचे आरक्त मुखकमल प्रतिबिंबित झालेले पाहून शंकराला मंत्राचा विसर पडला . ( प्रिया जवळ असल्यामुळे ) आपले चित्त व्याकुळ झाले आहे, हे कोणाच्याही ध्यानी येऊ नये म्हणून ( जणू आपण मनातल्या मनात मंत्र म्हणत आहोत असे भासविण्यासाठी) ज्याने ओठ हलविले त्या शिवाला नमस्कार असो…
#महाशिवरात्र, म्हणजे #शिव-पार्वतीचा विवाह झाला ती रात्र , आपल्याकडे हा प्रकृती-पुरुष मिलनाचा उत्सव दिवसा साजरा होतो, पण दुर्गम खेड्या-पाड्यांमध्ये आजही महाशिवरात्रीचा दिवस नाच-गाण्यात , शिव-शक्ती स्मरणात घालवण्याची परंपरा आहे, कारण गावखेड्यातील लोकांना अद्याप शिकलेल्या लोकांप्रमाणे दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करण्याची सवय लागलेली नाही. जय बम भोले , नम: शिवाय !
Please follow and like us:
Leave a Reply