वाड्याजवळील गातेस मधील
श्री शिवक्षेत्रं वैतरणेश्वर
– योगेश गोतारणे
हजारो वर्षांपासून भारतातील शिवमंदिरे ही शक्तीच्या उपासनेची केंद्रस्थाने राहिलेली आहेत.शिव याचा अर्थ मंगल जे या जिवसृष्टीला हितकारक, मानवतेला उपकारक ते सर्व शिव अर्थात पवित्र मंगल होय. प्रभू शिवाची स्थाने ही आज पर्यंत मांगल्याची केंद्रबिंदू ठरली आहेत. शिवमंदिरे पुरानकाळापासून भक्ती व शक्तीचा संगम अबाधित ठेवून आहेत. महाराष्ट्रतील नवनिर्वाचित पालघर जिल्हातील वाडा तालुका हा जंगलांनी वेढलेला तालुका असला तरी या तालुक्यास फार मोठी ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. त्रेतायुगात व व्दापारयुगात हाच भाग दंडकारण्य म्हणून ओळखला जायचा. हा भाग निबिड अरण्यानी युक्त होता. याच तालुक्याची जिवनवाहिनी वैतरणा नदी ही त्र्यंबकेश्वर जोर्तिलिंग येथील ब्रंम्हगिरी पर्वतातून उगम पावून ही पश्चिमवाहिनी नदी वसई तालुक्यात अरबी समुद्राला मिळते.
सह्याद्री शिषेॅ विगले, वसन्त गोदावरी तीरे पवित्रदेशे
यदार्थनात्यतक माशु नाशं प्रयतितं त्र्यंबकेश्वरे
याच दिव्यतेजाने भारलेल्या ज्योतिर्लिंगाची आत्मीक शक्ती माझ्या वाडा तालुक्याची भाग्यरेषा लिहिणाऱ्या नदीच्या किनाऱ्यावर बहुजनांचा कैवारी देवाधिदेव शिवशंभू महादेव स्वयंभू लिंग रूपाने स्थित आहे. ते पवित्र निर्मळ स्थान म्हणजे
श्री शिवक्षेत्रं वैतरणेश्वर-गातेस खुर्द
||शिवशंभोची कृपा ज्यावर असे पवित्र धाम||
||गातेस खुर्द गावी वसलंय वैतरणेश्वर त्याचे नाव||
खळाळणारा निर्झर, हिरवीगार झाडी, पशुपक्षांचे गुंजन अश्या पवित्र वैतरणा मातेच्या तिरावर अनेक शतकांपासून एक प्राचीन शिवमंदिर वसले आहे. ज्या गावात साक्षात शिवशंकराचे तत्व निपजले आहे. असे वाडा तालुक्यातील शिवधाम म्हणजे गातेस खुर्द गावी वसलेले वैतरणेश्वर शिवमंदिर. या स्थानाला फार मोठा वैभवशाली इतिहास लाभलेला आहे. कोनसई गावचे तात्कालिन कोळसा व्यापारी श्री. बाबाजी आबाजी मोकाशी (बाबाजी शेठ) यांच्या तिन बहिणी गातेस खुर्द गावी सासुरवाशीण म्हणून नांदत होत्या. त्यामुळे त्यांच्या तिन-चार पिढ्यांचे नातेसंबंध गातेस गावाशी घट्ट टिकून होते. या गावाला वैतरणा नदीचे विस्तीर्ण नदीपात्र लागूनच आहे. गावाची शेवटची वेस नदीच्या काठावर संपते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. याच वैतरणा नदीच्या पात्रात अनेक खडक पाण्यात बुडालेले आहेत. त्यामुळे ते बऱ्याच वेळा नजरेस पडत नाहीत. मात्र मधोमध असलेल्या एका पाषाणावर प्रकटलेले स्वयंभू शिवलिंग बहिणीकडे ख्यालीखुशाली विचारायला आले असताना बाबजी शेठ यांच्या त्या दिवशी नजरेस पडले. अन त्यांना दृष्टांत झाला. त्यांनी तात्काळ नदीकाठावर असलेल्या श्री. वामन गोमा पाटील यांच्या मालकी असलेल्या जागेवर या शिवलिंगाला आणून त्याची यथासांग पुजा आरंभली. बाबाजी शेठ व्यवसायाने कोळसा व्यापारी.त्या काळी आगगाडी व जहाजांसाठी ब्रिटीशांना मोठ्या प्रमाणात लाकडी कोळसा गरजेचा होता. त्याकाळी वाडा तालुक्यात जंगल संपत्ती भरपूर त्यातही तेल्या सागाची मूबलक झाडे या सागाला अगदी तुर्कस्थान, इराण इ. देशात फार मागणी. त्यामुळे मुंबई बेटावरील ब्रिटीश, वसई प्रांताचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचे सिद्धी, मालवणचे डच यांच्या कडून मोठ्या प्रमाणात या सागवानी लाकडाला मागणी असायची. त्यामुळे या कोळसा व लाकूड व्यापारात फारच चलती असायची. तोडलेले लाकूड नालासोपारा, वसई बंदरातून थेट परदेशात पाठवले जाई. बाबाजी शेठ यांनी वैतरणेश्वराची यथासांग सहपरीवार पुजा केली आणि त्या सिझनला जंगल कटाई आणि कोळसा भट्टी रचली. त्यावर्षी न भूतो भविष्यती असा चांगल्या प्रतिचा कोळसा निघाल्याने धंद्यात बरकत मिळाली आणि बाबाजी मोकाशींची श्रद्धा वैतरणेश्वरावर दृढ झाली. त्या वर्षी त्रिपुरारी पौर्णिमेलाच त्यांनी उघड्या माळात असलेल्या वैतरणेश्वरावर सागवानी लाकूड व नळीची कौला वापरून छप्पर शाकारलं. पक्या विटा पाडून मंदीराला अर्ध्या भिंतींचे बांधकाम केले व मालकी तोडणाऱ्यां मजुरांसह, गावकऱ्यांना आमंत्रित करून जेवणाची पंगत दिली. त्यावर्षी पासून दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला पुजा बांधून महादेवाचा कौल घेऊन जंगल कटाई करायची असा नेमच बाबाजी शेठ यांचा बनला. आजही वैतरणेश्वर महादेवाच्या पुजेचा पहिला मान बाबाजी मोकाशी परीवाराचा आहे. त्याचे पुत्र श्री. शंकर बाबाजी मोकाशी दरवर्षी सपत्निक महाशिवरात्रीस पुजा बांधतात. कोनसई ग्रामस्थ व गातेस खुर्द गावचे ग्रामस्थ एकत्रित येवून वैतरणेश्वर महादेवाशी लिन होवून हरीपाठ, भजन, पूजाअर्चा मोठ्या भक्ती भावाने करतात. आज गावातील युवाशक्तीने एकत्रित येवून प्रचंड मेहनतीने मंदीराचा संपूर्ण परीसराचा चेहरामोहरा बदलला आहे. पूर्वी विजेची व्यवस्था नव्हती तरीही मंदीरातील अखंड नंदादीप तेवत असायचा. ती परंपरा आजही कायम आहे. पक्क्या शिवमंदीराची उभारणी १९४०-४५ च्या दशकात गावातील ग्रामस्थांच्या वर्गणीतून केली. जुनेजाणते ग्रामस्थ याचे साक्षीदार आहेत. पूर्वीच्या काळी मंदीराला लाकडी पोटमाळा होता. मंदीराच्या गर्भगृहात तिन शिवलिंग व बाहेर पाषाणी नंदी स्थित असून ३० फूट रूंद व ४० फूट लांब मंदीराची बांधणी मोठी आखीव रेखीव व सुबक आहे. मंदीरातील शिवलिंग प्राचीन व स्वयंभू आहे.मंदीराच्या खालील अंगालाच खळाळत वाहणारे वैतरणा नदीचे पात्र आहे. हे विस्तीर्ण पात्र भाविकांना मोहीत करते. पाण्याच्या प्रवाहावरून येणारी थंडगार झुळुक भक्तांचे भान हरपून टाकते. वैतरणा नदी पात्राचे पाणी शेतीसाठी उपयोगी व्हावे म्हणून बांधलेल्या बंधाऱ्याच्या म्हसोबा देवाच्या खडकावरही पाण्यात स्वयंभू शिवपिंड आहे मात्र ती आता दृष्टीस पडत नाही. उन्हाळ्यात पाणी कमी झाले की तिचे दर्शन भक्तभावीकांना घडते. एरवी वर्षभर ते शिवलिंग पाण्याखाली असते. वैतरणेश्वर-गातेस खुर्द च्या शिवरात्री यात्रेस शेकडो वर्षांपासूनची परंपरा लाभली आहे. नदीपात्रालगत भरलेली यात्रा, गर्दीने फुललेला बाजार, भक्तीमय वातावरणात दर्शनासाठी शिस्तबद्ध रांग, भावीकांनी गजबजलेला सोहळा असे विलोभनीय दृश्य पाहून भान हरपून जायला होते.
१३/१४ व्या शतकात शिलाहार राजा प्रतापबिंबाचे राज्य असताना त्याने अनेक गावे वसवली. शिलाहार राजे शैव पंथीय अर्थात शिवशंभूची पूजा करणारे. त्यामुळेच या मंदीराचा लौकिक खऱ्या अर्थाने टिकून राहीला. गातेस खुर्द गावी ज्या चार शिवपिंड आहेत त्यातील एक नदीपात्रात लुप्त असून तिन शिवलिंग मंदीरात स्थित आहेत. गावाच्या परीसरात अनेक विर योद्धाच्या स्मृती प्रित्यर्थ असणाऱ्या विरगळी शाबूत होत्या. लाकडात असल्याने पाण्यापावसात त्या नष्ट झाल्या. मात्र गद्धेगळ आजही पहायला मिळेल. गातेस गावाचा उल्लेख शासनाच्या दस्तऐवजांमध्येही आढळतो. तात्कालिक ब्रिटीश सेनेच्या तोफ खान्याचा तळ ठाकरे पाडा /गांध्रे (वैतरणा नदी किनारी) असताना इंग्रज अधिकारी वेडिंगटन आणि w.b. mulok या अधिकाऱ्याने the best being gates in wada (वाड्यातील सुंदर गातेस आहे.) असा उलेख बॉम्बे गेझ्झेटियर मध्ये आढळतो कृषी समृद्ध गातेस गाव असा उल्लेख इंग्रजी पत्रात केला आहे. तसेच इतर शिवमंदिराबाबतचे पुरावा ही महिकावतीच्या बखरीत आपल्याला उपलब्ध आहे. नालासोपारा बंदरात वाडा कोलम तांदूळ, तेल्या साग व लाकडी कोलसा याची वाडा परीसरातून मोठ्या प्रमाणात आवक व्हायची याचा उल्लेख सापडतो. थोडक्यात ऐतिहासिक महत्त्व असलेले हे मंदिर पंचक्रोशीतील भावभक्तिमय वातावरण निर्माण करणारे पुरातन काळापासून अस्तित्वात असणार क्षेत्र आहे.
गावातील तरूणांनी एकत्र येत व जुन्या जाणत्या ग्रामस्थांचे मार्गदर्शन घेऊन नदीतीरावरील असणारी देवराई आज कृषी पर्यटन स्थळ म्हणून स्वखर्चाने विकसित केली आहे. जुन्या काळात कोहोज किल्ल्यावरून किंवा जव्हारच्या संस्थानातून कामा निमित्ताने आलेल्या वाटसरूना विसाव्याचे हक्काचे ठेकाण म्हणजे हे देवाच्या नावाने राखलेल ठिकाण म्हणजेच देवराई. थंडगार पाण्याचा डोह, निसर्गनिर्मित गच्च झाडी अन समतल जागा अगदी मनाची अवस्था चिरनिद्रेत घेऊन जाणारी.
तूर, वाल, चना, मूग, उडीद या कडधान्य बरोबरच फुलशेती, फळशेती यांनी बहरलेली जमीन व त्यात राबत असणारे कष्टकरी हात ही गातेस खुर्द गावाची ओळख याचा यथोचित प्रत्यय प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी शिवभक्तीचा सोहळा याची देही याची डोळा साठवण्यासाठी या गातेस खुर्द गावाच्या निसर्गरम्य परिसरात आत्मीक अनुभूती लाभण्यासाठी आपण सहकुटुंब जरूर यावे व शिवस्थानाला भेट द्यावी.
: योगेश नंदा तुकाराम गोतारणे
औदुंबर निवास, गातेस बु, ता. वाडा, जि. पालघर
Leave a Reply