आज संपूर्ण दिवस नवी मुंबईतील “चाणक्य पाॅईंट” जवळील पाणथळ भाग पाहत फिरलो. निमित्त होतं, फ्लेमिंगो म्हणजे रोहित पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास पाहण्याचे. पांढऱ्याशुभ्र लिननच्या साडीवर लाल चुटक काठ आणि तसाच लोभस लाल रंग भरलेला पदर कसा दिसेल, तसा दिसतो हा देखणा पक्षी. शेकडोंच्या संख्येत हे पक्षी नवी मुंबई, उरण, ठाणे खाडी परिसरात येतात. पण आता वाढत्या नागरिकरणाने हा भाग प्रदूषित झालाय. इतका की त्या भागातील किनार्यावर फिरणं कठीण झालंय.
कांदळवनांच्या दाट झुडपांमध्ये डचमळणारे प्रदूषित काळे पाणी, कचऱ्याचे ढीग आणि अतिक्रमण करून केलेली बांधकामे पाहून मन उद्विग्न होत होते. नवी मुंबई महापालिकेच्या डौलदार मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जर ही स्थिती असेल, तर अन्य ठिकाणांबद्दल नबोललेलं बरं…
गेल्या काही दिवसांपासून, या समुद्री पक्षाला पॉपकॉर्न, चणे – शेंगदाणे खायला देण्याची अक्षरशः लाट आली आहे. मुंबईला जोडणाऱ्या, ठाणे, नवी मुंबईतील सगळ्या खाडी पुलावर सकाळ – संध्याकाळ या पक्ष्यांना खाऊ घालण्याची जणू स्पर्धा लागलेली असते. वास्तविक पाहता, चणे – फुटाणे हे काय फ्लेमिंगो चे खाणे नाही. पण सायबेरियातून आपल्याकडे येणाऱ्या या पक्षांना जर हे असे “आयते” खाण्याची सवय झाली, तर त्यांच्या जीवनचक्रात प्रचंड बदल होईल. जो निसर्ग नियमांच्या विरोधात असेल. वन विभागाने कृपया, हे सारे थांबवावे ही कळकळीची विनंती.
नवी मुंबईतील या चाणक्य पाॅईंटजवळ जाताना ८४ वर्षाचे मधुकर म्हात्रे काका भेटले. कमरेला पारंपरिक आगरी – कोळी लोकं नेसतात, तशी लंगोटी, ज्याला “सुरका” बोलतात, ती त्यांनी नेसली होती. गप्पांमधून त्यांचा जीवनप्रवास समजला. आणि नवी मुंबई कशी घडली, तेसुद्धा कळले. गेली पंचवीस वर्षे पंढरपूरची वारी करणारे काका, व्यवसायाने मच्छिमार असले तरी शाकाहारी आहेत. नवी मुंबईतील विकास आणि स्थानिक लोकांची उपेक्षा या विषयावर बोलता, बोलता ते थांबले, आणि उद्गारले, “माझी वाडवडिलांनी सांभाळून ठेवलेली जमीन सिडकोने सुरुवातीला पंधरा हजार रुपये एकराने घेतली. आणि आता तिच जमीन ते दुसर्यांना करोडो रुपयांत विकताहेत. तो पहा माझा पोरगा चिखलात चिंबोर्या शोधतोय…” मी त्यांनी दाखवलेल्या दिशेकडे पाहिले, एक तरुण मुलगा बोट वल्हवत आमच्याच दिशेने येत होता… जसा जवळ आला, तसा त्याचा वेग मंदावला…
चिखलात रुतणारे वल्हे मारताना, त्याचे खांदे भरून आले असावेत…
त्या जाणिवेने वृद्ध काकांची नजर उगाचच दूरच्या क्षितिजाचा वेध घेऊ लागली होती… माझ्या मनात आलं, हा समुद्र, ही अस्ताव्यस्त पसरलेली खाडी… आणि निरव शांतता, अशाच हतबल, उपेक्षितांच्या घामाने, अश्रुंनी खारट झाली असेल… दमट झाली असेल…
माझ्या डोळ्यात भरतीची लाट येण्याआधी, मी समुद्राकडे पाठ फिरवली … समोर, नवी मुंबईच्या टोलेजंग इमारतींची आकाश रेषा मोठी मोठी होताना दिसत होती.
महेश म्हात्रे
संपादक
महाराष्ट्र रिसर्च सेंटर
Leave a Reply