मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सांगितले की, मुंबईत असलेल्या विशाल तांत्रिक क्षमतेमुळे आणि उत्कृष्ट परिसंस्थेमुळे लवकरच ही आर्थिक राजधानी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) क्षेत्रात देशाचे नेतृत्व करेल.
मुंबई टेक वीक २०२५ मध्ये बोलताना फडणवीस यांनी विज्ञान, पायाभूत सुविधा आणि शेतीसह विविध क्षेत्रांमध्ये एआयच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “एआय ही भविष्यातील दिशा आहे. समस्यांचे निराकरण आणि नवीन उपाय शोधण्यासाठी त्याचा प्रभावी वापर करणे अनिवार्य आहे.”
फडणवीस यांनी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या आवश्यकतेवर जोर दिला. ते म्हणाले, “शेतीला शाश्वत आणि उत्पादक बनवायचे असल्यास तंत्रज्ञानाचा अधिकाधिक समावेश आवश्यक आहे.” ते पुढे म्हणाले की, जरी माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मुंबईने बेंगळुरू आणि हैदराबादच्या तुलनेत काहीसं स्थान गमावले असले, तरी मुंबई देशाची एआय राजधानी बनेल. महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सायबर गुन्ह्यांबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, “गुन्हेगारीचे स्वरूप बदलत आहे. भविष्यात ७०% गुन्हे हे सायबर गुन्हे असतील, तर केवळ ३०% गुन्हे पारंपरिक असतील.” याचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सायबर सुरक्षा मुख्यालय स्थापन केले आहे. तसेच बँका, NBFCs, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि संपूर्ण सायबर इकोसिस्टमसाठी एकात्मिक प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला आहे.
राज्यातील नागरिकांनी ‘१९४५’ या हेल्पलाइन क्रमांकावर सायबर गुन्ह्यांची तक्रार नोंदविल्यास त्यावर त्वरित कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. फडणवीस यांच्या मते, नवी मुंबई सध्या भारतातील ६०% डेटा सेंटर क्षमतेचा वापर करते, त्यामुळेच ती देशाचा डिजिटल गड ठरत आहे. त्यांनी लवकरच सुरू होणाऱ्या एम-हब या नव्या उपक्रमाची घोषणाही केली. हा इनक्यूबेटर तंत्रज्ञान कंपन्यांना प्लग-अँड-प्ले वर्कस्पेस पुरवेल, जेणेकरून स्टार्टअप्स आणि उद्योजकांना अधिक संधी उपलब्ध होतील.
राज्य सरकार आणि टेक एंटरप्रेन्योर्स असोसिएशन ऑफ मुंबई (TEAM) यांच्या सहकार्याने सुरू झालेला मुंबई टेक वीक २०२५ या कार्यक्रमाचा १ मार्च रोजी समारोप झाला. या उपक्रमाचे उद्दिष्ट मुंबईला आशियातील ‘एआय युज केस कॅपिटल’ म्हणून विकसित करणे आहे. फडणवीस यांनी META सोबतच्या नव्या भागीदारीची घोषणाही केली. राज्य सरकार आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ५०० सरकारी सेवा पुरवणार आहे, यामुळे अगदी दुर्गम भागातील नागरिकांनाही त्वरित सेवा उपलब्ध होतील.
TEAM ने TEAM Angels नावाच्या संस्थापक-नेतृत्वाखालील गुंतवणूक गटाची स्थापना केली आहे. हा गट मुंबईतील स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करेल. गुंतवणुकीची रक्कम ५० लाखांपासून ५-६ कोटी रुपयांपर्यंत असणार आहे.मॅककिन्से अँड कंपनी च्या सहकार्याने TEAM ने ‘मुंबई एआय २०३५’ हा महत्वाकांक्षी रोडमॅप सादर केला.
• २०३५ पर्यंत मुंबईत १०० पेक्षा जास्त युनिकॉर्न कंपन्या असतील.
• यातील ८०% स्टार्टअप्स नफा कमावणारे असतील.
• या स्टार्टअप्सनी १४० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक गुंतवणूक उभारली असेल.
“कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्राला बदलून टाकत आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण मोठी प्रगती करू शकतो,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. मुंबई टेक वीक २०२५ हा कार्यक्रम विविध उद्योगांसाठी एआयच्या परिवर्तनकारी भूमिकेवर प्रकाश टाकेल. यामुळे मुंबई लवकरच देशाच्या एआय क्रांतीचे केंद्र बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला..
Leave a Reply