मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहेत. अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे लवकरच राजीनामा देणार असल्याचं बोललं जातं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडेंना राजीनामा द्यायला सांगितल्याची माहिती मिळतेय.
फोटो समोर आल्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे काही फोटो समोर आले आहेत. त्यामुळे हे प्रकरण आणखीच तापले आहे. संतोष देशमुख यांची हत्या किती क्रूर आणि निर्घृणपणे करण्यात आली होती, हे समोर आलेले फोटो पाहून लक्षात येते.
गुन्हे अन्वेषण विभाग (CID) या प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात हे फोटो जोडण्यात आले आहेत. फोटो माध्यमातून समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यभर तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यानंतर अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर उशिरा रात्री बैठक पार पडली. या बैठकीत मुंडेंना राजीनामा द्यायला लावण्याचा निर्णय झाल्याचं कळतंय. त्यामुळे थोड्याच वेळात धनंजय मुंडे आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्याची शक्यता आहे.
नेमकं प्रकरण काय?
मागील 3 महिन्यापासून संतोष देशमुख हत्याप्रकरण राज्यभर गाजत आहेत. हा नेमका प्रकरण काय, हे आदी जाणून घेऊया.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं.
गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडून या प्रकरणातील आरोपींनी कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे. विरोधकांनीही या प्रकरणावरून टीकेची झोड उडवली आहे. सध्या गुन्हे अन्वेषण विभाग या प्रकरणाचा तपास करत आहे. अशातच, देखमुख यांना अमानुषपणे मारहाण करतानाचे फोटो पुढे आले असून वातावरण चिघळण्याची शक्यता आहे. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी आज निषेधार्थ बंद पाळण्यात येणार असल्याच्या बातम्या समोर येत आहे.
हत्येतील आरोपी वाल्मिक मुंडेंच्या जवळचा
संतोष देशमुख हत्येतील आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे. त्यांचे सर्व कारभार तोच सांभाळतो. त्यामुळे पहिल्या दिवसापासून धनंजय मुंडे यांच्यावर वेगवेगळे आरोपासह राजीनाम्याची मागणी होत होती. अखेर हत्येचे क्रूर फोटो समोर आल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनामा घेण्यात यावा, अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे आज राजीनामा देणार आहेत.
Leave a Reply