रोहित शर्मावर आक्षेपार्ह टिप्पणी; काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांना ताकीद, क्रीडामंत्र्यांकडूनही टीका

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांच्या शारीरिक वजनावरून केलेल्या असभ्य वक्तव्यामुळे काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. समाजमाध्यमांवर त्यांच्या या शेरेबाजीवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्याने काँग्रेस पक्षाने त्यांना तातडीने ताकीद दिली. या टीकेनंतर शमा मोहम्मद यांनी ‘एक्स’वरील वादग्रस्त पोस्ट हटवली. दरम्यान, केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनीही शमा मोहम्मद यांची पोस्ट अतिशय लज्जास्पद असल्याचे म्हणत टीका केली.

रोहित शर्मा खेळाडू म्हणून जाड आहे. त्याने वजन कमी करण्याची गरज आहे! तो आतापर्यंतचा सर्वात प्रभावहीन कर्णधार आहे! अशी टीका शमा मोहम्मद यांनी रविवारी रात्री ‘एक्स’वर केली होती. त्यांच्या या विधानावर जोरदार टीका सुरू झाल्यानंतर काँग्रेसने स्पष्ट केले की, रोहित शर्मावरील वक्तव्य हे पक्षाचे अधिकृत मत नाही. काँग्रेसच्या माध्यम व प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेड़ा यांनी या प्रकरणाची दखल घेत शमा मोहम्मद यांना भविष्यात अशा प्रकारच्या वक्तव्यांबाबत खबरदारी घेण्याचा इशारा दिला.

या प्रकरणावरून भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी या वक्तव्यावर टीका करत, संघाचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी हे नियोजनपूर्वक करण्यात आले आहे; असा आरोप केला. रोहित शर्मा यासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूबद्दल अशा प्रकारची विधानं करणे अयोग्य असल्याचे अनेक चाहत्यांनीही स्पष्ट केले.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *