मुंबई : मुंबईतील लोकल प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आसनगाव, अंबरनाथ, भाईंदर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे चार नवीन रेल्वे पोलीस ठाणे स्थापन करण्यास गृहविभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे १९९९ नंतर प्रथमच महामुंबईत नव्या रेल्वे पोलीस ठाण्यांची स्थापना होणार आहे. तसेच, या पोलीस ठाण्यांसाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त मनुष्यबळासाठी २७९ नवीन पदांना मान्यता देण्यात आली आहे.
मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेत दररोज सुमारे ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांची संख्या वाढत असतानाही १९९९ पासून मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गांवर केवळ १७ रेल्वे पोलीस ठाणी कार्यरत आहेत. या ठाण्यांमध्ये सुमारे चार हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात आहेत. वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर आसनगाव, अंबरनाथ, भाईंदर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे नवीन पोलीस ठाण्यांची गरज भासू लागली होती. यासाठी रेल्वे पोलिसांनी गृहविभागाकडे प्रस्ताव पाठवला होता, आणि अखेर रेल्वे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या पाठपुराव्यानंतर गृहविभागाने या प्रस्तावाला मंजुरी दिली.
मध्य रेल्वे मार्गावर कल्याण स्थानकानंतर थेट कसारा रेल्वे पोलीस ठाणे आहे. या दोन ठाण्यांतील अंतर तब्बल ६७ किलोमीटर असून, यामध्ये १२ रेल्वे स्थानके येतात. तसेच, कर्जत मार्गावर कल्याणनंतर थेट कर्जत रेल्वे पोलीस ठाणे आहे, आणि त्यामधील अंतर सुमारे ४६ किलोमीटर आहे. कल्याण जंक्शन हे मध्य रेल्वेचे एक महत्त्वाचे केंद्र असून, येथून एक्सप्रेस आणि लोकल दोन्ही गाड्या मोठ्या प्रमाणावर धावतात. शहाड, आंबिवली, टिटवाळा, वाशिंद, आसनगाव आणि खर्डी परिसरात मोठ्या वसाहती आहेत, ज्या मुंबईशी जोडल्या गेलेल्या आहेत.
त्यामुळे या भागांतील नागरिकांना एखादी तक्रार नोंदवायची असल्यास त्यांना थेट कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात जावे लागते. यामुळे या भागात नव्या पोलीस ठाण्याची मागणी केली जात होती.
मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. बोरिवली आणि वसईदरम्यान नवीन रेल्वे पोलीस ठाण्याची आवश्यकता होती. सध्या बोरिवली रेल्वे पोलिसांची हद्द जोगेश्वरी ते दहिसरपर्यंत आहे, तर वसई रेल्वे पोलिसांची हद्द मीरा रोड ते विरारपर्यंत आहे. त्यामुळे भाईंदर येथे नवीन पोलीस ठाणे सुरू झाल्यास वसई रेल्वे पोलिसांवरील ताण काही प्रमाणात कमी होईल.
कुर्ल्यातील लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथून दररोज सुमारे ६० लांबपल्ल्याच्या गाड्या सुटतात. येथे प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत असून, सध्या रोज १.५ लाखांहून अधिक प्रवासी या स्थानकाचा वापर करतात. एलटीटी सध्या कुर्ला रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षेत्रात येते, मात्र कुर्ला रेल्वे पोलिसांची जबाबदारी आणि वाढती प्रवासी संख्या पाहता येथे स्वतंत्र पोलीस ठाणे आवश्यक होते. नव्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात गोवंडी, मानखुर्द तसेच हार्बर मार्गावरील वडाळा ते गोरेगाव स्थानकांचा समावेश होऊ शकतो, यामुळे कुर्ला रेल्वे पोलिसांचा ताण कमी होईल. या चार पोलीस ठाण्यासाठी २७९ नवीन पदे निर्माण करणासाठी २५ कोटी एवढ्या आवर्ती खर्चाला व एक कोटी २१ लाख अनावर्ती खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे.
Leave a Reply