मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सर्व सीमा तपासणी नाके (check post) १५ एप्रिल २०२५ पर्यंत बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. रविवारी वरळी येथील नवीन परिवहन आयुक्त कार्यालय “परिवहन भवन” च्या भूमिपूजन सोहळ्यात ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. या निर्णयामुळे राज्यात वाहतुकीला अधिक वेग येईल, तसेच प्रवासी आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी विनाकाटछूट प्रवेश सुकर होईल. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि सल्लागार बाल मलकीत सिंह यांनी या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले की, चेकपोस्ट हटवल्याने वाहतूक वेळ वाचेल, आणि लाल फितीमुळे होणारा विलंब व भ्रष्टाचार कमी होईल.
मुख्यमंत्र्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी आणि परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांना या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच, बीओटी बिल्ड-ऑपरेट-ट्रांसफर तत्त्वावर चालणाऱ्या प्रकल्पांना योग्य भरपाई देण्याचे आश्वासनही दिले आहे.
सीमा तपासणी नाके हटवल्याने महाराष्ट्रातील व्यापार आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राला मोठी चालना मिळेल. हा निर्णय “एक राष्ट्र, एक बाजारपेठ” या केंद्र सरकारच्या धोरणाशी सुसंगत असून, डिजिटल प्रणालीद्वारे जीएसटी, ई-वे बिल, वाहन, सारथी आणि फास्टॅग कर संकलन सुलभ होईल.
महाराष्ट्राने हा निर्णय घेतल्यामुळे गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, हरियाणा, पंजाब, आंध्र प्रदेश, ओडिशा, झारखंड, उत्तराखंड, आसाम यांसारख्या आधीच चेकपोस्ट हटवलेल्या राज्यांच्या बरोबरीत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Leave a Reply