गाय तस्करीच्या संशयावरून युवकाची हत्या; हरियाणात पाच गोरक्षक अटकेत

हरियाणातील पलवल येथे गाय तस्करीच्या संशयावरून एका ट्रकचालक आणि त्याच्या सहकाऱ्याचे अपहरण करून अमानुष मारहाण केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी पाच गोरक्षकांना अटक केली आहे. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून दुसऱ्याने पळ काढून आपला जीव वाचवला.या टोळक्याने दोघांना बेदम मारहाण केली आणि त्यानंतर त्यांना मृत असल्याचे समजून कालव्यात फेकून दिले. मात्र, ट्रकचालक बालकिशन पाण्यातून पोहत बाहेर आला आणि त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. दरम्यान, त्याचा सहकारी संदीप आठ दिवसांपासून बेपत्ता होता. रविवारी त्याचा मृतदेह कालव्यातून सापडला.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी हे एका गोरक्षण संस्थेशी संबंधित आहेत. त्यांनी या दोघांवर लाठी-काठ्या, तलवारी आणि हातोड्याने हल्ला केला. या मारहाणीत संदीपला गंभीर दुखापती झाल्या आणि त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आठ दिवस शोधमोहीम राबवल्यानंतर त्याचा मृतदेह सापडला. हा मृतदेह ज्या ठिकाणी फेकण्यात आला होता, त्यापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर आढळला. सहा महिन्यांपूर्वी फरिदाबादमध्येही असाच एक प्रकार घडला होता. एका लहान मुलाला आणि त्याच्या मित्रांना पाच जणांनी अनेक किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. अखेरीस या मुलावर गोळी झाडून त्याचा संशयित गोरक्षकांनी खून केला होता.
या प्रकरणात अटक करण्यात आलेले पाच आरोपी पंकज, निखिल आणि देवराज हे पलवलचे रहिवासी आहेत, तर पवन हा गुरुग्रामचा आणि नरेश हा नूहचा रहिवासी आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, २२ फेब्रुवारीच्या रात्री बालकिशन आणि संदीप हे दोघे राजस्थानहून उत्तर प्रदेशातील लखनौला गायी घेऊन जात असताना ते वाट चुकले आणि आरोपींच्या तावडीत सापडले. दुचाकीवर असलेल्या गोरक्षक टोळीने त्यांना थांबवले, जबरदस्तीने ट्रकमधून खाली उतरवले आणि त्यांच्यावर अमानुष हल्ला केला. त्यानंतर त्यांना गुरुग्रामच्या सोहना भागातील कालव्यात फेकून दिले.
बालकिशनच्या तक्रारीवरून कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. हरियाणाचे पोलीस अधीक्षक चंद्र मोहन यांनी प्रत्येक आरोपीच्या अटकेसाठी ५,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. मृत संदीप हा राजस्थानच्या गंगानगर जिल्ह्यातील रहिवासी होता. या घटनेनंतर स्थानिकांमध्ये मोठा संताप उसळला असून, पोलिसांनी आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *