माजी उपमुख्यमंत्री आणि दिवंगत नेते रामराव आदिक यांच्या मृत्यूनंतर बनावट कागदपत्रांच्या आधारे २००७ पासून पेन्शन लाटल्याच्या प्रकरणी प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉ. लेखा पाठक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामराव आदिक यांचे पुत्र पृथ्वीराज आदिक यांच्या तक्रारीनंतर आणि न्यायालयाच्या आदेशाने मरिन ड्राइव्ह पोलिसांनी ही कारवाई केली. पृथ्वीराज आदिक यांच्या तक्रारीनुसार, १९४८ मध्ये रामराव आदिक यांचा शोभा आदिक यांच्याशी विधिवत विवाह झाला होता. १९९६ मध्ये रामराव आदिक यांनी प्रकृती अस्वस्थतेमुळे राजकारणातून निवृत्ती घेतली. त्यानंतर त्यांचे घरीच उपचार सुरू होते आणि कार्डिओलॉजिस्ट डॉ. लेखा पाठक यांचा त्यांच्या उपचारात सहभाग होता.
काही वर्षांनी रामराव आदिक आणि डॉ. लेखा पाठक वांद्रे येथील निवासस्थानी ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहू लागले, तर त्यांची पत्नी आणि मुले प्रभादेवी येथील घरात राहात होते. २००७ मध्ये रामराव आदिक यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर सहा महिन्यांनी डॉ. लेखा पाठक यांनी मृत्युपत्र दाखवले, ज्यामध्ये शोभा आदिक किंवा त्यांच्या कुटुंबीयांचा कोणताही उल्लेख नव्हता. त्यामुळे कुटुंबाला संशय आला आणि त्यांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला. काही वर्षांनी दोन्ही पक्षांमध्ये समझोता झाला.
२०२१ मध्ये आदिक कुटुंबाला कळाले की, डॉ. लेखा पाठक या २००७ पासून रामराव आदिक यांच्या नावाने निवृत्तीवेतन घेत आहेत. शोभा आदिक यांनी विधिमंडळ सचिवालयाशी पत्रव्यवहार केला, त्यावेळी धक्कादायक सत्य समोर आले. डॉ. लेखा पाठक यांनी स्वतःला रामराव आदिक यांच्या पत्नी असल्याचे दाखवून विधानमंडळात खोटी कागदपत्रे सादर केली. इतकेच नव्हे, तर त्यांनी स्वतःला आदिक यांची पत्नी असल्याचे सांगत दोन मुले पृथ्वीराज आणि सुरेश असल्याचे भासवले. माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या दस्तऐवजांनुसार, डॉ. पाठक यांनी २००७ पासून निवृत्तीवेतन घेतल्याची नोंद आढळली.
पृथ्वीराज आदिक यांनी आरोप केला आहे की, डॉ. लेखा पाठक यांनी संपूर्णपणे बनावट कागदपत्रे वापरून राज्य शासन, विधानमंडळ आणि त्यांच्या कुटुंबाची फसवणूक केली. २००७ पासून घेतलेले निवृत्तीवेतन हे पूर्णतः अवैध आहे आणि याबाबत कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी तक्रारीत केली आहे. या प्रकरणावर बोलताना आदिक कुटुंबाचे वकील अॅड. पांडुरंग पोळ यांनी विधानमंडळातील अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची योग्य खातरजमा का केली नाही? डॉ. लेखा पाठक यांचा अर्ज कोणत्या आधारावर स्वीकारला? असा सवाल उपस्थित केला आहे. सध्या मरिन ड्राइव्ह पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, डॉ. लेखा पाठक यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.


Leave a Reply