काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे वारंवार चर्चेत येतात. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबाबत मोठे विधान करत नवीन वादाला तोंड फोडले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी इतर पक्षातील नेत्यांवर टीका करण्याऐवजी स्वतःच्या काँग्रेस पक्षाच्या दिवंगत नेत्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
एका मुलाखतीदरम्यान मणिशंकर अय्यर म्हणाले, “जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान झाले, तेव्हा मला आश्चर्य वाटले. कारण, दोनदा अपयशी झालेला माणूस देशाचा पंतप्रधान कसा होऊ शकतो?” त्यांनी राजीव गांधी यांच्या शैक्षणिक पात्रतेवरही प्रश्न उपस्थित करत सांगितले की, “मी राजीव गांधी यांच्यासोबत केंब्रिज विद्यापीठात शिकलो. त्या विद्यापीठात नापास होणे कठीण असते, कारण प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तीर्ण करण्याचा प्रयत्न होतो.
मात्र, तरीही राजीव गांधी अपयशी ठरले. त्यानंतर त्यांनी लंडनच्या इम्पीरियल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, पण तिथेही ते अपयशी ठरले. त्यामुळे दोनदा अपयशी ठरलेला माणूस देशाचे नेतृत्व कसे करू शकतो?”
मणिशंकर अय्यर यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. भाजप नेते अमित मालवीय यांनी हा व्हिडीओ त्यांच्या “एक्स” अकाउंटवर शेअर केला असून, टाइम्स ऑफ इंडिया नेही या संदर्भात वृत्त प्रकाशित केले आहे.
मणिशंकर अय्यर यांच्या विधानानंतर काँग्रेसने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेस नेते हरीश रावत म्हणाले, “मी निराश व्यक्तीच्या विधानांवर भाष्य करू इच्छित नाही. राजीव गांधी यांनी देशाला आधुनिक दृष्टीकोन दिला. त्यांनी अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणासाठी ठोस पावले उचलली. मात्र, दुर्दैवाने पक्षातील काही लोक त्यांच्या पाठीशी उभे राहिले नाहीत, अन्यथा देशाचा इतिहास वेगळा असता.” मणिशंकर अय्यर यांच्या या विधानामुळे काँग्रेसमध्ये नाराजी असून, या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप वाढण्याची शक्यता आहे.
Leave a Reply