महाराष्ट्र सरकारचा महत्वाचा निर्णय: वाघ व बिबट्यांच्या हल्ल्यांपासून संरक्षणासाठी ₹२०० कोटी मंजूर

महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच काही शहरी भागांमध्ये वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली असून, त्यामुळे नागरिकांचे जीव जात आहेत आणि शेतीचेही मोठे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संरक्षणात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने सौर कुंपण उभारण्यासाठी ₹२०० कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी बुधवारी विधानसभेत ही घोषणा केली. तसेच, साखळी कुंपण उभारण्याचाही विचार सरकार करत असून यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.भंडारा जिल्ह्यातील कोका वन्यजीव अभयारण्याच्या बफर झोनमध्ये एका महिलेला वाघाने ठार मारल्यानंतर स्थानिक नागरिकांनी वन विभागाविरोधात तीव्र आंदोलन छेडले. याशिवाय, राज्यातील विविध भागांमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत या गंभीर विषयावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, वन्यजीवांचा वाढता वावर शेतकऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. हंगाम सुरू असताना अनेकांना आपल्या शेतांमध्ये जाणे कठीण झाले आहे. त्यामुळे वनालगतच्या गावांमध्ये सौर किंवा साखळी कुंपण उभारणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
वनमंत्री गणेश नाईक यांनी राज्यातील वाघांच्या वाढत्या संख्येबाबत माहिती देताना सांगितले की, २००० साली वाघांची संख्या १०१ होती, जी २०२५ पर्यंत ४४४ वर पोहोचली आहे.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वाघ आणि बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी वनमंत्र्यांना शुक्रवारी विशेष बैठक घेण्याचे निर्देश दिले असून, या बैठकीत जनप्रतिनिधींसोबत चर्चा करून अतिरिक्त संरक्षणात्मक उपाययोजना निश्चित केल्या जाणार आहेत.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *