मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटके आणि व्यापारी मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याला जामिनावर मुक्त करण्याची मागणी उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. न्यायालयाने स्पष्ट केले की, अटकेच्या वेळी वाझे कोणतेही अधिकृत कर्तव्य बजावत नव्हते. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी गृहविभागाची पूर्व मंजुरी आवश्यक नसल्याचे न्यायालयाने ठामपणे सांगितले.
न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने वाझेची याचिका फेटाळताना महत्त्वाची टिप्पणी केली. अँटिलियाबाहेर स्फोटकांनी भरलेले वाहन उभे करणे, त्याचा कट रचणे आणि व्यापारी मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट अमलात आणणे या घटनांदरम्यान वाझे कोणतेही अधिकृत कर्तव्य बजावत नव्हते. त्यामुळे, ‘मी कर्तव्यावर होतो’ असा त्यांचा दावा समजण्यापलीकडचा आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. याच आधारावर राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) राज्य सरकारची मंजुरी घेण्याची गरज नव्हती, असेही न्यायालयाने स्पष्ट करत वाझेच्या सुटकेचा मार्ग बंद केला.
Leave a Reply