परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले की, काश्मीरचा प्रश्न तेव्हाच पूर्णतः सुटेल, जेव्हा पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात येईल. ब्रिटनच्या दौऱ्यावर असलेल्या जयशंकर यांनी लंडनमधील ‘चॅथम हाऊस’च्या कार्यक्रमात बोलताना ही महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. जयशंकर यांनी असेही नमूद केले की, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प परराष्ट्र धोरणात बदल करत होते, ज्याचा भारताला फायदा होण्याची शक्यता होती. त्यांच्या निर्णयांमुळे संपूर्ण जग एका नव्या व्यवस्थेकडे वाटचाल करत आहे, असे ते म्हणाले. परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, काश्मीर समस्येच्या सोडवणुकीसाठी भारताने तीन महत्त्वपूर्ण टप्पे पार पाडले आहेत.
1. कलम ३७० हटवणे – हा पहिला आणि मोठा निर्णय होता.
2. काश्मीरमध्ये विकास आणि आर्थिक स्थैर्य निर्माण करणे – हा दुसरा टप्पा.
3. विधानसभा निवडणुका घेणे – हा तिसरा आणि शेवटचा टप्पा.
हे सर्व टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण झाले असून, पीओके भारताच्या ताब्यात आल्यानंतर काश्मीर प्रश्न कायमचा सुटेल, असे जयशंकर यांनी ठामपणे सांगितले. जयशंकर यांनी भारत-चीन
संबंधांबाबतही भाष्य केले. इतिहास पाहता दोन्ही देशांमध्ये अनेक चढउतार आले, मात्र सध्या परिस्थिती सुधारत आहे. भारत आपल्या सीमांचे रक्षण करण्यास प्राधान्य देत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
जयशंकर यांचा ब्रिटन दौरा विवादास्पद ठरला, कारण खलिस्तानवाद्यांनी त्यांच्या गाडीला घेरण्याचा प्रयत्न केला आणि भारताविरोधात घोषणाबाजी केली. बुधवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. भारताने या घटनेचा तीव्र निषेध केला असून, ब्रिटननेही त्यावर संताप व्यक्त केला. मात्र, या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे स्थानिक पोलिसांनी सांगितले.
Leave a Reply