कुर्ल्यात हॉटेलमध्ये चिकन खाल्लं अन् कुटुंबाला बसला ८ लाखांचा फटका! महिलेसोबत नेमकं काय घडलं?

मुंबई : खाण्याची हौस कधी कधी मोठ्या संकटात टाकू शकते, याचं जिवंत उदाहरण मुंबईतील कुर्ल्यात घडलेली ही घटना आहे. ३ फेब्रुवारी रोजी, शेख कुटुंब रात्रीच्या जेवणासाठी हॉटेलमध्ये गेले. तिथे त्यांनी चिकन आणि बिर्याणीचा आस्वाद घेतला, मात्र हे जेवण त्यांच्यासाठी अत्यंत महागात पडलं. एका महिलेला चिकनचं हाड घशात अडकल्यामुळे तिच्या जीवावर बेतण्याची वेळ आली आणि संपूर्ण कुटुंबाला तब्बल ८ लाखांचा फटका बसला.
नेमकं काय घडलं?

महिलेने कुटुंबासोबत जेवण केलं, मात्र चिकनचं एक हाड तिच्या घशात अडकलं, आणि तिला त्याची जाणीवही झाली नाही. काही वेळाने तिच्या घशात तीव्र वेदना आणि त्रास सुरू झाला, त्यामुळे तिला तातडीने क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. एक्स-रे अहवालानुसार, मानेजवळ एक अज्ञात वस्तू अडकल्याचं निदर्शनास आलं. डॉक्टरांनी तिला त्वरित रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला, मात्र तिने तो नाकारला. काही दिवसांनी तिची प्रकृती अधिक बिघडली ताप, उच्च रक्तदाब आणि संसर्ग वाढला, त्यामुळे तिला पुन्हा रुग्णालयात भरती करावं लागलं.

शस्त्रक्रिया आणि ८ लाखांचं हॉस्पिटल बिल

रुग्णालयात दाखल केल्यानंतर महिलेची एंडोस्कोपी आणि सीटी स्कॅन करण्यात आला, त्यात अन्ननलिकेत ३.२ सेमी लांब चिकनचं हाड अडकल्याचं समोर आलं. हे हाड अडकून तिच्या अन्ननलिकेला मोठं नुकसान झालं होतं, त्यामुळे डॉक्टरांनी ८ तासांची जटिल शस्त्रक्रिया करून ते काढून टाकलं. या उपचारांसाठी हॉस्पिटलने कुटुंबाला तब्बल ८ लाखांचं बिल दिलं. मात्र, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पाहून हॉस्पिटलने बिलाची रक्कम निम्मी केली. उपचारानंतर महिलेला तब्बल २१ दिवस अन्न गिळता आलं नाही, त्यामुळे ट्यूबच्या माध्यमातून तिला आहार दिला जात होता.
ही घटना केवळ एक लहानशी चूक किती मोठ्या संकटात टाकू शकते, याचं धक्कादायक उदाहरण आहे. वेळेत उपचार न घेतल्याने परिस्थिती अधिक बिघडू शकते, त्यामुळे अशा त्रासाकडे दुर्लक्ष न करता त्वरित वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *