गेल्या १३ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला अखेर वेग मिळत असून सरकारने डिसेंबर 2025 पर्यंत हा महामार्ग पूर्णपणे सुरू करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार आणि इतर सदस्यांनी महामार्गाच्या रखडलेल्या कामांबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी उत्तर देताना आतापर्यंत झालेल्या कामाचा लेखी अहवाल सादर केला.
मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रलंबित कामांसाठी गेल्या १३ वर्षांत तब्बल १५,६०० कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती देण्यात आली. हा महामार्ग राज्यातील एक महत्त्वाचा दुवा असल्याने प्रवाशांसाठी तो लवकरात लवकर सुरू होणे आवश्यक आहे, असे मंत्री भोसले यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे सुरू असलेल्या कामांपैकी ८४.६० किमी लांबीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. पनवेल ते कासू (४२.६ किमी) मार्गावरील मोठे पूल व उड्डाणपुलांचे काम मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होईल. कासू ते इंदापूर (४२.३ किमी) मार्गावरील पूल व उड्डाणपुलांचे काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
कशेडी घाटातील बोगद्यांचे काम अंतिम टप्प्यात
मुंबई-गोवा महामार्गाच्या कशेडी घाट चौपदरीकरण प्रकल्पात दोन बोगद्यांचा समावेश आहे. त्यापैकी एक बोगदा पूर्ण झाला असून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. दुसऱ्या बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात असून तो मार्च २०२५ पर्यंत वाहतुकीसाठी सुरू केला जाईल. राज्य सरकारने डिसेंबर २०२५ पर्यंत संपूर्ण महामार्ग प्रवाशांसाठी खुला करण्याचा मानस व्यक्त केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, कामाला वेग मिळाल्याने २०२५ पर्यंत महामार्ग पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे..
Leave a Reply