मुंबईकरांसाठी सुवर्णक्षण लवकरच येणार आहे. देशातील सर्वात मोठ्या भुयारी मेट्रो प्रकल्पांपैकी एक असलेली कफ परेड ते सीप्झ मेट्रो सेवा येत्या जून २०२५ पासून सुरू होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. तसेच राज्यातील इतर मेट्रो प्रकल्प २०२५ ते २०२७ या कालावधीत पूर्ण करण्याचा सरकारचा निर्धार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई मेट्रोच्या वेगवान प्रगतीबद्दल माहिती दिली. २०१४ ते २०१९ या काळात एकूण दहा मेट्रो प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. त्यातील काही सेवा सुरू झाल्या आहेत, काही अंतिम टप्प्यात आहेत, तर काहींचे काम जोरात सुरू आहे. विशेषतः कुलाबा-सीप्झ मेट्रो (मेट्रो-३) चे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून चाचणीही यशस्वी पार पडली आहे. ही मेट्रो देशातील सर्वात मोठी भुयारी रेल्वे सेवा असेल, असे त्यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ६ डिसेंबर २०२५पर्यंत पूर्ण होणार.
इंदू मिल येथे उभारल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी सरकारने आतापर्यंत १७२ कोटी रुपये खर्च केले आहेत. स्मारकाच्या मुख्य इमारतीचे काम पूर्ण झाले असून, ३५० फूट उंच पुतळ्यासाठी निश्चिती करण्यात आली आहे. हा संपूर्ण प्रकल्प १,०९० कोटी रुपयांचा असून, डिसेंबर २०२५ पूर्वी पूर्ण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
मात्र, पुतळ्याचे काम ठरलेल्या वेळेत पूर्ण होईल का याबाबत शंका आहे, पण सुप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे काम उत्कृष्ट सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी राज्यातील वीज ग्राहकांसाठी मोठी घोषणा करत वीज दरात घट करण्याची माहिती दिली. राज्यात १०० युनिटपर्यंत वीज वापरणारे ७०% ग्राहक म्हणजेच दीड कोटी नागरिक आहेत. त्यांच्यासाठी सौरऊर्जा योजना आणली जात असून, त्यामुळे या ग्राहकांना वीजबिलातून मोठी सूट मिळणार आहे. १०० युनिटपर्यंतच्या ग्राहकांना २४% सूट मिळेल, तर १०० ते ३०० युनिट वापरणाऱ्यांना १७% सूट दिली जाईल. पहिल्यांदाच वीज दरात दरवर्षी ९% वाढ होण्याऐवजी घट होणार आहे.
कोल्हापूरमधील शक्तीपीठ महामार्गाला काहींनी विरोध केला असला तरी स्थानिक शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला पाठिंबा आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.’मी नुकताच कोल्हापुरात गेलो असता, २०० शेतकऱ्यांनी माझी भेट घेतली आणि १,००० शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन देत हा महामार्ग व्हावा अशी मागणी केली,” असे फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणांमुळे मुंबईकरांसाठी अनेक दिलासादायक निर्णय जाहीर झाले आहेत. कुलाबा-सीप्झ मेट्रो लवकरच प्रत्यक्षात येणार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाला वेग, वीज बिलात मोठी सूट, शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद.
Leave a Reply