शहरी भागातील महिलांच्या रोजगारात गेल्या सहा वर्षांत तब्बल १०% वाढ झाली असून, २०२३-२४ मध्ये महिलांचा श्रमिकांमधील सहभाग २८% वर पोहोचला आहे. ही वाढ महिलांच्या आर्थिक सबलीकरणाचे सकारात्मक संकेत देते, मात्र काही चिंताजनक बाबीही पुढे आल्या आहेत. तरुण महिलांमध्ये बेरोजगारी घट, पण पुरुषांसाठी नवा पेच २० ते २४ वयोगटातील तरुण महिलांमधील बेरोजगारीचे प्रमाण याच काळात १०% वरून ७.५% पर्यंत घसरले आहे, जे निश्चितच उत्साहवर्धक आहे. मात्र, याउलट तरुण पुरुषांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे, आणि हे नवीन सामाजिक आव्हान ठरू शकते.
चेन्नईच्या ग्रेट लेक्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटने प्रसिद्ध केलेल्या अहवालात भारतातील शहरी महिलांसाठी वाढत्या रोजगार संधींवर प्रकाश टाकला आहे. मात्र, यात एक मोठा गंभीर मुद्दा समोर आला आहे;शिक्षण आणि कौशल्य असतानाही महिलांना हलक्या दर्जाच्या नोकर्या स्वीकाराव्या लागत आहेत. एकूण रोजगार निर्मितीचा वेग अपेक्षेपेक्षा कमी आहे, त्यामुळे महिलांना त्यांच्या कौशल्याला साजेशा नोकऱ्या मिळणे कठीण झाले आहे. यामुळे समाजात दीर्घकालीन सामाजिक आणि आर्थिक असमतोल निर्माण होण्याची शक्यता आहे. आपल्या समाजात नेहमी कुटुंबाचा प्रमुख कमावता पुरुष असतो, अशी मानसिकता रुजलेली आहे. मात्र, महिलांना अधिक नोकऱ्या मिळू लागल्याने पुरुष बेरोजगारीत वाढ होत आहे. नवीन रोजगार संधी महिलांना प्राधान्य देत असताना, पुरुषांसाठी रोजगार संधी मर्यादित राहिल्या आहेत. यामुळे कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर मोठ्या बदलांना तोंड द्यावे लागू शकते.
या अहवालावर भाष्य करताना, ग्रेट लेक्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या अर्थशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. विद्या महांबरे म्हणाल्या शहरी महिलांचा श्रमबळात सहभाग वाढत असला तरी, त्यांचे उत्पन्न, करिअरमधील वाढ आणि घरगुती जबाबदाऱ्या यामध्ये अद्याप खऱ्या अर्थाने लिंग समानता दिसत नाही. हा खरा बदल घडवायचा असेल, तर सर्वांसाठी पुरेशा आणि योग्य रोजगाराच्या संधी निर्माण करणे ही काळाची गरज आहे.
महिलांच्या वाढत्या रोजगार संधी हा निश्चितच विकासाचा एक सकारात्मक टप्पा आहे, पण त्याचबरोबर पुरुष बेरोजगारी आणि असमतोल वाढू नये, यासाठी संपूर्ण समाजाला या बदलाचा तोल सांभाळण्याची गरज आहे.


Leave a Reply