नेपाळमध्ये राजेशाही पुनर्स्थापनेसाठी वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर, माजी राजा ज्ञानेंद्र शाह यांच्या स्वागतासाठी रविवारी राजधानी काठमांडूमध्ये हजारोंच्या संख्येने समर्थक रस्त्यावर उतरले. “राजा या, राष्ट्र वाचवा” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.वृत्तसंस्था एएफपीच्या माहितीनुसार, ७७ वर्षीय माजी राजा ज्ञानेंद्र शाह पश्चिम नेपाळच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी हजारो नागरिकांनी नेपाळी ध्वज फडकवत जल्लोष केला. या रॅलीमध्ये राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाच्या कार्यकर्त्यांसह हजारो राजेशाही समर्थक सहभागी झाले होते. निदर्शकांनी “आम्हाला आमचा राजा परत हवा आहे” आणि “संघीय प्रजासत्ताक व्यवस्था रद्द करा” अशा आशयाचे फलक हातात घेतले होते.
एपीच्या अहवालानुसार, विमानतळाबाहेर १०,००० हून अधिक लोक एकत्र जमल्यामुळे प्रवेशद्वार रोखले गेले, परिणामी प्रवाशांना पायी जावे लागले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी दंगल पोलिस तैनात करण्यात आले, मात्र कोणत्याही हिंसक घटनेची नोंद झाली नाही.
२००८ मध्ये नेपाळमधील २४० वर्षांची राजेशाही संपुष्टात आली. त्यानंतर गेल्या १६ वर्षांत १३ वेगवेगळी सरकारे आली, मात्र राजकीय अस्थिरता कायम राहिली.
त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी नाराजी दिसून येत आहे. एक समर्थक म्हणाले, “देशात अस्थिरता आहे, महागाई वाढली आहे, बेरोजगारीने कहर केला आहे, तर शिक्षण व आरोग्य सुविधा अपुऱ्या आहेत. कायदे सामान्य नागरिकांसाठी काटेकोरपणे लागू होतात, मात्र भ्रष्ट नेत्यांसाठी वेगळे नियम असतात. त्यामुळे आम्हाला पुन्हा राजेशाही हवी आहे.”
काही माजी राजेशाहीविरोधकांनीही आपली विचारधारा बदलल्याचे दिसत आहे. सुतार कुलराज श्रेष्ठ म्हणाले, “मी पूर्वी राजेशाहीविरोधी आंदोलनात सहभागी झालो होतो, पण आता माझी चूक लक्षात आली आहे. देश आणखी गर्तेत गेला आहे, त्यामुळे राजेशाही परत हवी आहे.”
माजी राजा ज्ञानेंद्र शाह यांचा राजकीय विषयांवर फारसा प्रत्यक्ष सहभाग नसतो, मात्र अलीकडच्या काळात त्यांची सार्वजनिक कार्यक्रमांतील उपस्थिती वाढली आहे.
फेब्रुवारी महिन्यात लोकशाही दिनाच्या पूर्वसंध्येला, त्यांनी एक निवेदन जारी करत नागरिकांना आवाहन केले होते –”राष्ट्र वाचवायचे असेल आणि राष्ट्रीय एकता टिकवायची असेल, तर सर्वांनी नेपाळच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे.” या निवेदनानंतर राजेशाही समर्थकांचा आवाज अधिक बळकट झाला आहे. राजेशाही पुनर्स्थापनेसाठी मोठा जनसमर्थन लाभत असला तरी, राजकीय विश्लेषक लोकराज बराल यांना मात्र त्यामध्ये यश मिळण्याची शक्यता कमी वाटते. “राजेशाहीचे पुनरागमन अशक्य आहे. सध्याच्या परिस्थितीत असे पाऊल देशाला अधिक अस्थिरतेच्या दिशेने नेऊ शकते,” असे त्यांनी एएफपीला सांगितले.
राजधानी काठमांडूमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. विशेषतः नारायणहिटी पॅलेस संग्रहालय परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, कारण शाह समर्थक राजवाड्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करू शकतात, अशी शक्यता प्रशासनाने वर्तवली होती.
दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईराला, या नेपाळचे पहिले निवडून आलेले पंतप्रधान बी.पी. कोईराला यांच्या नात असल्याने, त्यांनी नागरिकांना ज्ञानेंद्र शाह यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते.
राजकीय अस्थिरता, वाढती बेरोजगारी आणि आर्थिक संकट यामुळे नेपाळमध्ये राजेशाहीबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. राजेशाहीला पाठिंबा वाढत असला, तरी त्याचा भविष्यातील परिणाम काय असेल, हे येणारा काळच ठरवेल.
Leave a Reply