एअरटेल आणि एलॉन मस्कच्या स्टारलिंकचा मोठा करार; रिलायन्स जिओला जबरदस्त टक्कर

दिल्ली : भारतीय टेलिकॉम क्षेत्रात मोठी घडामोड घडली असून, भारती एअरटेलने अमेरिकन उद्योजक एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीसोबत भागीदारी करत भारतात स्टारलिंकच्या हाय-स्पीड इंटरनेट सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. या करारामुळे एअरटेल आपल्या स्टोअर्समध्ये स्टारलिंक उपकरणांची विक्री करू शकणार असून, व्यवसायांसाठी देखील स्टारलिंकच्या सेवा उपलब्ध करून देणार आहे. ग्रामीण भागातील शाळा, आरोग्य केंद्रे आणि दुर्गम भागांत इंटरनेट सेवा पोहोचवण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. याशिवाय, एअरटेल आणि स्पेसएक्स स्टारलिंक, एअरटेलच्या नेटवर्कला कशाप्रकारे पाठबळ देऊ शकते आणि भारतातील एअरटेलच्या पायाभूत सुविधांचा स्पेसएक्स कसा उपयोग करू शकतो, याचाही सखोल अभ्यास केला जाणार आहे.

या भागीदारीबाबत भारती एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष गोपाल विट्टल म्हणाले, स्पेसएक्ससोबतची ही भागीदारी भारतातील पुढील पिढीच्या सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीसाठी आमची वचनबद्धता दर्शवते. यामुळे भारताच्या दूरदूरच्या भागातही जागतिक दर्जाचा हाय-स्पीड ब्रॉडबैंड पोहोचवण्याची क्षमता मिळेल. यामुळे प्रत्येक व्यक्ती, व्यवसाय आणि समुदायाला विश्वासार्ह आणि परवडणाऱ्या इंटरनेट सेवेचा लाभ घेता येईल.
स्पेसएक्सच्या अध्यक्ष ग्वेन शॉटवेल यांनीही या सहकार्याबाबत आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, भारतीयांसाठी उत्कृष्ट सेवा देण्याच्या दृष्टीने एअरटेलसोबत काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत. स्टारलिंकच्या माध्यमातून जोडले गेलेले लोक आणि संस्थांनी जे प्रेरणादायी कार्य केले आहे, ते पाहून आम्ही नेहमीच प्रभावित झालो आहोत. भारताच्या टेलिकॉम क्षेत्रात एअरटेलची भूमिका महत्वाची आहे आणि त्यांच्या नेटवर्कला पूरक ठरण्यासाठी आमची सेवा उपयुक्त ठरेल.
या कराराअंतर्गत, एअरटेल आणि स्पेसएक्स स्टारलिंक नेटवर्कचा विस्तार कसा करता येईल, याचा अभ्यास केला जाणार आहे. भारतातील एअरटेलच्या ग्राउंड-बेस्ड नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रभावी वापर आणि त्यातून कसे फायदे घेता येतील, यावर विशेष लक्ष दिले जाईल.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *