सातारा – लय भारी युट्यूब चॅनेलचे पत्रकार तुषार खरात यांच्यावर अट्रोसिटी आणि 5 कोटीच्या खंडणीचे 2 स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. अट्रोसिटीप्रकरणी कोर्टानी त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र यादरम्यान तुषार खरात यांनी अन्नत्याग केल्याने त्यांची प्रकृती खराब झाली आहे. ते सध्या काहीही खात नसल्याने सलाईनवर आहेत. आज (गुरुवारी) कोठडीची मुदत संपणार असून त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे. याआधी मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांच्यावर विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव आणला होता. तो प्रस्ताव अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंजूर केला आहे. त्याव्यतिरिक्त त्यांच्यावर दहिवडी आणि वाडूज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
शेखर सुरेश पाटोळे (रा. वडूज, ता. खटाव) यांनी तुषार खरात व अनोळखी दोघांविरुद्ध वडूज पोलिस ठाण्यात शनिवारी (8 मार्च) ऑॅट्रॉसिटीची तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरून गुन्हा दाखल करत पोलिसांनी तुषार खरात यांना मुंबईतून ताब्यात घेऊन अटक केली. या गुन्ह्यात न्यायालयाने खरात यांना तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या कोठडीची मुदत गुरुवारी (13 मार्च) संपत आहे. त्यामुळे आज त्याना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचं पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले. न्यायालयानं पोलिस कोठडी दिल्यानंतर तुषार खरात यांनी अन्न घेण्यास नकार दिला. गेली दोन दिवस त्यांनी अन्नत्याग केलाय. त्यामुळे त्यांना अशक्तपणा असून ते सध्या सलाईनवर आहेत, अशी माहितीही पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली. तसेच उद्या त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार असल्याचंही सोनवणे यांनी सांगितलं.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी थांबवायची असेल तर ५ कोटी रुपयांची खंडणी द्या, अन्यथा आणखी महिलांकडून खोटे गुन्हे दाखल करायला सांगेन, अशी धमकी तुषार ऊर्फ तात्यासो आबाजी खरात यांनी माझ्या कार्यकर्त्याला मुंबईत बोलावून दिल्याची तक्रार स्वतः मंत्री गोरे यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात दिली आहे. तुषार खरात हे माण विधानसभा मतदारसंघातील रहिवासी आहेत आपल्याबद्दल सोशल मीडियावर त्यांनी मानहानीकारक व बदनामीकारक पोस्ट केल्या आहेत. माझे कार्यकर्ते बळवंत पाटील यांना मुंबईत बोलावून घेतले. जयकुमार गोरे यांना मिटवून घ्यायला सांगा. अन्यथा त्यांचे मंत्रिपद मी घालवणार आहे. मिटवायचे असेल तर मंत्री गोरे यांना 5कोटी रुपये
द्यायला सांगा, असं खरात कार्यकर्त्याला म्हणाल्याचं मंत्री गोरे यांनी आपल्या तक्रारीत नमूद केलं आहे.


Leave a Reply