गडचिरोली पोलिसांचा अभिनव उपक्रम – ‘सायबर दूत’ मोबाईल व्हॅनचा शुभारंभ

सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलिसांनी ‘सायबर दूत’ नावाची विशेष मोबाईल व्हॅन सुरू केली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना सायबर सुरक्षेची माहिती देण्यात येणार असून, त्यांना ऑनलाईन फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यास मदत केली जाणार आहे.

गडचिरोली पोलिस मुख्यालयात झालेल्या या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (विशेष ऑपरेशन्स) डॉ. चेरिंग दोर्जी यांनी ‘सायबर दूत’ व्हॅनचे लोकार्पण केले. या वेळी गडचिरोली विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

अलीकडच्या काळात इंटरनेट आणि सामाजिक माध्यमांमुळे सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ऑनलाईन फसवणूक, खोट्या सरकारी योजना, ऑनलाईन गेमिंग घोटाळे आणि व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलद्वारे आर्थिक फसवणूक यांसारख्या गुन्ह्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागात सायबर सुरक्षेविषयी जागरूकता कमी असल्याने नागरिकांना माहिती देण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी हा उपक्रम सुरू केला आहे.

ही मोबाईल व्हॅन जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, बसस्थानके आणि दुर्गम भागांमध्ये जाऊन नागरिकांना सायबर सुरक्षेची माहिती देईल. पोस्टर्स, बॅनर्स, ऑडिओ-व्हिडिओ संदेशांच्या माध्यमातून लोकांपर्यंत माहिती पोहोचवली जाईल. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना सायबर गुन्ह्यांविषयी जागरूक करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

उद्घाटन सोहळ्यात जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी नागरिकांना मोबाईल आणि इंटरनेटचा वापर करताना सतर्क राहण्याचे आवाहन केले. “संशयास्पद ऑनलाईन व्यवहारांना बळी पडू नका, सतर्क राहा आणि आपल्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वतः घ्या,” असे त्यांनी स्पष्ट केले.

‘सायबर दूत’ उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी गडचिरोली सायबर पोलिस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले. पोलिस निरीक्षक अरुण फेगडे, उपनिरीक्षक नेहा हांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या उपक्रमाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. गडचिरोली पोलिसांचा हा अभिनव उपक्रम जिल्ह्यातील नागरिकांना सायबर सुरक्षेसाठी अधिक सजग आणि सशक्त करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *