राज्यातील गुंतवणूकदारांना जास्त व्याजाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या योजनांविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी अशा योजनांच्या जाळ्यात अडकू नये, असं आवाहन त्यांनी केलं.
जास्त व्याज देणाऱ्या योजना म्हणजे फसवणूक
टॉरेस घोटाळ्याबाबत विधान परिषदेतील चर्चेदरम्यान विधान परिषदेचे सदस्य शशिकांत शिंदे म्हणाले, जास्त व्याज देणाऱ्या ९९% योजना फसवणुकीच्या असतात. बँकेच्या व्याजदरापेक्षा दोन ते चार टक्के जास्त व्याज मिळणं शक्य आहे, पण त्याहून जास्त व्याज देणं अशक्य आहे. त्यामुळे अशा योजनांपासून नागरिकांनी सावध राहावं.
फडणवीस यांनी सांगितलं की, अशा फसवणूक योजनांपासून नागरिकांना सावध करण्यासाठी शासनातर्फे जाहिराती देण्यात येणार आहेत.
राज्यात गुंतवणुकीवर विशेष नजर
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितलं की, राज्यातील गुंतवणूक आणि आर्थिक संस्थांवर देखरेख ठेवण्यासाठी आर्थिक गुप्तचर विभाग (Economic Intelligence Unit) स्थापन केला जात आहे. यामुळे अशा फसवणूक प्रकरणांवर नियंत्रण ठेवता येईल. टॉरेस घोटाळ्यात फसवले गेलेल्या गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेनुसार कारवाई सुरू असल्याची माहितीही योगेश कदम यांनी दिली.
फडणवीस यांनी नागरिकांना आवाहन केलं की, कोणत्याही आकर्षक व्याजदराच्या आमिषाला बळी पडू नका. गुंतवणूक करण्यापूर्वी योजना आणि संस्थांची सखोल तपासणी करा, अन्यथा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
Leave a Reply