भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री देबेंद्र प्रधान यांचे सोमवारी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये मंत्री म्हणून काम पाहिलेले प्रधान यांनी नवी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पुत्र धर्मेंद्र प्रधान हे सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत आहेत. ओडिशा भाजपचे माजी अध्यक्ष असलेल्या प्रधान यांनी राज्याच्या विकासासाठी मोठे योगदान दिले.
ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी प्रधान यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, देबेंद्र प्रधान हे एक लोकप्रिय जननेते आणि कुशल संसदपटू होते. १९९९ ते २००१ या काळात त्यांनी केंद्रीय वाहतूक आणि कृषी मंत्रिपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. खासदार आणि मंत्री म्हणून त्यांनी अनेक लोककल्याणकारी योजना राबवून जनतेचा विश्वास मिळवला. संपूर्ण जीवन त्यांनी सेवा आणि दृढ संकल्पाने राज्याच्या प्रगतीसाठी समर्पित केले.ते पुढे म्हणाले, देश आणि राज्याने एक महान लोकसेवक गमावला आहे. मुख्यमंत्र्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्याशी संवाद साधून त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केली.ओडिशा विधानसभेतील विरोधी पक्षनेते नवीन पटनायक यांनी देखील प्रधान यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी सांगितले, त्यांचे संघटन कौशल्य आणि दृढ व्यक्तिमत्त्व कायम लक्षात राहील. त्यांच्या निधनाने ओडिशाने एक प्रभावी राजकीय नेतृत्व आणि लोकप्रिय नेते गमावले आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोशल मीडियावर दुःख व्यक्त करताना लिहिले, माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते देबेंद्र प्रधान यांच्या निधनाने मी दुःखी झाले आहे. मी त्यांना अनेक वर्षांपासून ओळखत होते. लोकसेवेतील त्यांचे समर्पण आणि ओडिशाच्या तसेच देशाच्या विकासासाठी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. त्यांच्या कुटुंबीयांना आणि समर्थकांना माझ्या संवेदना. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रधान यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. ते म्हणाले, सांसद आणि मंत्री म्हणून त्यांनी गरिबी निर्मूलन आणि सामाजिक सशक्तीकरणावर विशेष भर दिला. त्यांच्या योगदानाला देश कायम स्मरणात ठेवेल.
ओडिशामध्ये विरोधी पक्षाचे उपनेते प्रसन्न आचार्य यांनी प्रधान यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले ओडिशाच्या राजकीय पटलावर त्यांचे योगदान मोठे आहे. १९९८ मध्ये बीजू पटनायक यांच्या निधनानंतर भाजप आणि बीजेडी यांच्यातील युती घडवण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यांचा राजकीय प्रभाव आणि नेतृत्व कायम स्मरणात राहील,असे आचार्य यांनी म्हटले. ते पुढे म्हणाले, त्यांचा मृत्यू केवळ राजकीय नुकसान नाही, तर तो ओडिशाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनासाठीही मोठा धक्का आहे. त्यांची अनुपस्थिती ओडिशाच्या राजकारणासाठी आणि समाजासाठी मोठी हानी ठरेल. त्यांच्या आत्म्यास मी श्रद्धांजली अर्पण करतो.
Leave a Reply