राज्यात गोहत्या व गोवंश तस्करीवर आधीपासूनच बंदी असली तरी अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे संबंधित आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (MCOCA) कठोर कारवाई केली जाईल, असा ठाम इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिला.
विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी राज्यातील वाढत्या गोवंश तस्करीच्या घटनांकडे लक्ष वेधले. त्यांनी सरकारकडे यावर कोणती ठोस उपाययोजना केली जात आहे, याची विचारणा केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर देताना स्पष्ट केले की, “राज्य सरकार गायींच्या तस्करीवर बारकाईने लक्ष ठेवत असून, या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल. वारंवार असे गुन्हे करणाऱ्यांवर मोक्कांतर्गत कठोर पावले उचलण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात येतील.”
याच संदर्भात गृह राज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर यांनी विधानसभेत माहिती देताना सांगितले की, जिल्ह्यातील अहिल्यानगर भागातील अतिक कुरेशी या व्यक्तीविरुद्ध गोवंश तस्करीचे तब्बल २० गुन्हे नोंद आहेत. त्याला २० जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती, मात्र १ मार्च रोजी तो जामिनावर सुटला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत अशा गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाईचा निर्धार व्यक्त केला. “सतत गुन्हे करणाऱ्या आरोपींवर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) १९९९ मध्ये लागू करण्यात आला असून, तो माफिया गुन्हेगारी, अंडरवर्ल्ड कारवाया, खंडणी, खून, अपहरण, अंमली पदार्थांची तस्करी तसेच अवैध व्यवसाय यांसारख्या गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी वापरला जातो. कोणताही गट आर्थिक फायद्यासाठी वारंवार अशा गुन्ह्यांमध्ये सामील असल्यास, त्यांच्यावर MCOCA अंतर्गत कठोर कारवाई केली जाते.
Leave a Reply