राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करत त्यांची खिल्ली उडवली. एका मुलाखतीत बोलताना फडणवीसांना विचारण्यात आले की, भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पुन्हा युती होऊ शकते का? यावर त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला आणि स्पष्ट केले की, भविष्यात अशा कोणत्याही युतीची शक्यता नाही. यावेळी उपमुख्यमंत्री पदावरील लाडके कोण, असा प्रश्न विचारण्यात आला असता, फडणवीस म्हणाले, आम्ही तिघेही लाडके आहोत. दोन्ही उपमुख्यमंत्री लाडके आहेत, आणि त्यांचा मीही लाडका आहे म्हणून आम्ही तिघेही लाडके मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहोत.
संजय राऊत यांच्यावर टीका करताना फडणवीस म्हणाले, राऊतांनी स्वतःचा तपास करून घ्यायला हवा. चांगली मानसोपचार रुग्णालये आता उपलब्ध आहेत. गरज लागल्यास सरकार त्याचा संपूर्ण खर्च उचलायला तयार आहे. अगदी सिंगापूरमधील मानसोपचार रुग्णालयात पाठवायचे झाले, तरी सरकार त्याचा खर्च करेल इतकंच नाही, तर फडणवीस पुढे म्हणाले, आजच मी घोषणा करतो की, यासाठी बजेटमध्येही तरतूद करू. पण त्यांनी निदान स्वतःची तपासणी करून घ्यावी.
नागपूर हिंसाचारावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले की, या प्रकरणात काही सोशल मीडिया पोस्ट या बांगलादेशी भाषेत आढळल्या आहेत. त्यामुळे हा व्यापक कटाचा भाग असू शकतो. त्यांनी यावर सध्या अधिक बोलणे टाळले, मात्र तपास सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दिशा सालियान प्रकरणाबाबत फडणवीस म्हणाले, हा विषय आता न्यायालयात आहे. न्यायालय जो निर्णय देईल, त्यानुसार सरकार आपली भूमिका घेईल. यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरही बोलताना फडणवीस दिसले.
Leave a Reply